India Morning News
मुंबई: मरोळ-पवई परिसरात घडलेल्या धक्कादायक घटनेने संपूर्ण शहर हादरले आहे. अभिनय प्रशिक्षण देणाऱ्या एका स्टुडिओमध्ये काही अल्पवयीन मुलांना ओलीस धरल्याची घटना समोर आली असून, पोलिस आणि अग्निशमन दलाच्या तात्काळ कारवाईत सर्व मुलांची सुरक्षित सुटका करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रोहित आर्या नावाच्या व्यक्तीने सुमारे ८ ते १० मुलांना स्टुडिओत बंदिस्त केले होते. त्याने सरकारविरोधात संताप व्यक्त करत, “माझ्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर मी स्फोट घडवून जीव घेईन,” अशी धमकी दिली होती.
ही घटना तेव्हा उघडकीस आली, जेव्हा मुलांना नेहमीप्रमाणे सुट्टीसाठी बाहेर सोडण्यात आले नाही. पालकांनी संपर्क साधल्यानंतर पोलिसांना माहिती मिळाली आणि त्यांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून परिसर सील केला.
प्राथमिक तपासात उघड झाले आहे की, आर्या यांनी एका सरकारी प्रकल्पात गुंतवणूक गमावली होती आणि सरकारला जबाबदार धरत लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. त्याने पालकांना धमकीचे व्हिडिओ संदेश देखील पाठवले होते.
या कारवाईदरम्यान काही जण किरकोळ जखमी झाले असून, पोलिसांनी आर्याला अटक केली आहे. सध्या सर्व मुलं सुरक्षित असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.










