India Morning News
मुंबई:- महायुती सरकारच्या बेशिस्त प्रशासनामुळे मुंबईसह संपूर्ण राज्य पावसाच्या पाण्यात बुडाले आहे. मंत्रालयासारख्या महत्त्वाच्या प्रशासकीय इमारतीत पाणी शिरणे हे केवळ नैसर्गिक आपत्ती नसून, सरकारच्या उदासीनतेचे द्योतक आहे, असा घणाघाती हल्ला काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केला. “हा निसर्गाचा इशारा आहे,” असे ते म्हणाले.
पटोले यांनी महायुती सरकारवर भ्रष्टाचार आणि निष्काळजीपणाचे आरोप केले. “कोट्यवधी रुपये खर्च करूनही मुंबई स्वच्छ होत नाही, रस्ते सुधारत नाहीत, ड्रेनेज व्यवस्था दुरुस्त होत नाही. नद्यांमधील कचऱ्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे,” असे ते म्हणाले.
शेतकऱ्यांचे नुकसान, सरकारचे दुर्लक्ष
अवकाळी पावसाने रब्बी हंगामातील गहू, हरभरा, मका, धान आणि फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, सरकार केवळ आकडेवारी जाहीर करते, शेतकऱ्यांना मदत मिळत नाही. “मागील वर्षीच्या नुकसानीची भरपाई अद्याप मिळालेली नाही. शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर आहे,” असे पटोले यांनी नमूद केले.
पुण्यातील पूर : बिल्डर लॉबीचा संगनमत?
पुण्यातील पूरस्थितीवरही पटोले यांनी टीका केली. “उपमुख्यमंत्री अजित पवार वर्षानुवर्षे पुण्याचे पालकमंत्री असूनही नद्या रस्त्यांवर वाहतात. हे निष्काळजी नियोजन नसून बिल्डर लॉबीशी संगनमत आहे,” असा गंभीर आरोप त्यांनी केला. “महायुती सरकारला जनतेच्या समस्यांशी काही देणेघेणे नाही,” असेही ते म्हणाले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या
गेल्या चार वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्यांत निवडणुका घेण्याचे निर्देश देऊनही सरकारची उदासीनता कायम आहे. “प्रशासकांच्या माध्यमातून जनतेची लूट सुरू आहे,” असा आरोप पटोले यांनी केला.
राहुल गांधींच्या भूमिकेचे स्वागत
जातीनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भूमिकेचे पटोले यांनी स्वागत केले. “तेलंगणाप्रमाणे देशभरात ही जनगणना व्हायलाच हवी,” अशी काँग्रेसची भूमिका आहे, असे ते म्हणाले.
मोदींच्या भूमिकेवर टीका
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही पटोले यांनी निशाणा साधला. “शूर सैनिकांचा त्याग डावलून स्वतःच युद्ध जिंकल्याचा आव आणणे चुकीचे आहे. दहशतवादी हल्ल्यांबाबत सरकारची भूमिका काय? सुरक्षा व्यवस्थेत त्रुटी का राहिल्या?” असे प्रश्न उपस्थित करत त्यांनी मोदींच्या वक्तव्याचा निषेध केला.
अमित शहांच्या दौऱ्यावरही आक्षेप
“राज्य पूर आणि शेतकऱ्यांच्या संकटाने ग्रासले असताना महायुती सरकार अमित शहांच्या नांदेड दौऱ्याच्या तयारीत मग्न आहे. यांना जनतेच्या समस्यांपेक्षा सत्तेचीच चिंता आहे,” असा टोला पटोले यांनी लगावला.






Comments are closed