India Morning News
महाराष्ट्रातील दीर्घकाळापासून रखडलेल्या नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांना आज पहाटे सुरुवात झाली. सकाळी 7.30 वाजताच मतदारांनी अनेक केंद्रांवर मोठी रांग लावली होती. सुरक्षादलांचा तगडा बंदोबस्त, अधिकारी आणि कर्मचारी सज्ज असतानाच तांत्रिक अडथळ्यांनी प्रशासनाला पहिल्या तासातच घाम फोडला.
राज्यातील अनेक मतदान केंद्रांवर EVM मशीन अचानक ठप्प झाल्याने मतदान प्रक्रिया खुंटली. काही ठिकाणी तासाभर मतदान बंद राहिल्याने नागरिकांना दीर्घ प्रतिक्षा करावी लागली. मतदानाचा वेग मंदावल्याने मतदारांमध्ये असंतोष पसरला.
मोहोळमध्ये दोन केंद्रांवर तांत्रिक अडथळे
सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ नगरपरिषद क्षेत्रातील नेताजी प्राशाळा केंद्रावर मतदान सुरू होताच EVM ने काम करणे बंद केले. त्यामूळे मतदारांना रांगेतच थांबावे लागले. दरम्यान, आठवडी बाजार मतदान केंद्रावरही मशीन बंद पडल्याने स्थानिकांमध्ये चिडचिड वाढली. माजी आमदार रमेश कदम यांनी “EVM फक्त भाजपचे बटण स्वीकारत आहेत” असा गंभीर आरोप केला. यावर भाजप उमेदवार सुशील क्षीरसागर यांनी “पराभवाची भीती म्हणून खोटे आरोप केले जात आहेत” असे प्रत्युत्तर दिल्याने वातावरण तणावग्रस्त झाले.
खामगाव, चिपळूण आणि अक्कलकोट येथेही बिघाड
बुलढाणा जिल्ह्यातील खामगावमधील अनेक मतदान केंद्रांवर मशीन बंद असल्याने मतदानास उशीर झाला. चिपळूणमधील खेंड केंद्रावर EVM दोनदा बंद पडल्याने थंडीत उभ्या असलेल्या मतदारांनी संताप व्यक्त केला. अक्कलकोटच्या उर्दू शाळा केंद्रावरही सकाळी मतदान पूर्णपणे ठप्प झाले होते.
प्रशासनाने मतदान यंत्रणा सुरळीत ठेवण्यासाठी तयारी केली असली तरी सकाळच्या वेळेत सुरू झालेल्या तांत्रिक बिघाडांनी निवडणुकीच्या विश्वसनीयतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. जरी मशीन हळूहळू पुन्हा कार्यरत झाली असली तरी सुरुवातीच्या विलंबाचा मतदान टक्केवारीवर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.










