India Morning News
राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता, या निवडणुका राजकीय प्रभाव आणि प्रतिष्ठेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाच्या ठरल्या आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या तयारीवर सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे.
महायुतीमध्ये वरिष्ठ नेत्यांकडून निवडणुका एकत्रितपणे लढवल्या जातील असा इशारा दिला जात असताना, स्थानिक स्तरावरील पदाधिकाऱ्यांकडून काही ठिकाणी स्वबळावर लढण्याची इच्छा व्यक्त केली जात आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये महायुतीच्या तीनही घटक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांकडून स्वबळावर लढण्याचा पर्याय मांडला जात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे निवडणुकीत महायुती होणार की स्वतंत्र पक्ष स्वबळावर उतरतील, यावर मतभेद दिसून येत आहेत.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई महापालिकेसाठी महायुतीची युती निश्चित झाली आहे. येथे भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र लढणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप स्वतंत्रपणे उमेदवार उभे करणार, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. ठाणे महापालिकेसाठी अद्याप अंतिम निर्णय घेतला गेलेला नाही, येथे महायुती म्हणून लढता येईल का, याची चाचपणी सुरु असल्याचे फडणवीस म्हणाले. त्यांनी हेही स्पष्ट केले की, “जिथे विरोधकांना जास्त फायदा होईल, तिथे महायुती एकत्र लढणार.”
दरम्यान, महाविकास आघाडीच्या बाजूने स्थानिक निवडणुकीसाठी अद्याप कोणताही अंतिम निर्णय आलेला नाही. तरीही मनसे आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यात आगामी महापालिका निवडणुकीसाठी युती होईल की नाही, यावर चर्चा सुरू असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे राज ठाकरे महाविकास आघाडीच्या सहभागासह निवडणुकीत उतरतात का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.








