India Morning News
नागपूर :- प्रेमसंबंधात अडथळा ठरत असल्याच्या संशयातून एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याचा थरारक प्रकार समोर आला आहे. ही घटना मानकापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत गोरेवाडा टेकडी परिसरात शनिवारी रात्री १० वाजताच्या सुमारास घडली. तब्बल १४ तासांनी या खुनाचा उलगडा झाला.
या प्रकरणात पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून, एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलं आहे. मृत तरुणाचे नाव अमन गजेंद्र ध्रुववंशी (वय २०, रा. मानकापूर) असून, तो शिलाँग येथील कॉलेजमध्ये हॉटेल मॅनेजमेंटचं शिक्षण घेत होता. उन्हाळी सुटीमुळे अमन सध्या नागपुरातच आला होता.
अटक केलेले आरोपी-
लकी मेंढेवार (वय १८, रा. गंगाबाई घाट, लकडगंज)
अभिषेक कटारिया (वय २५)
सुलभ ठाकूर (वय २५, रा. गोरेवाडा, मानकापूर)
व एक अल्पवयीन साथीदार
खूनामागील कारण-
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी लकी मेंढेवारचे एका युवतीसोबत प्रेमसंबंध होते. परंतु, काही दिवसांपूर्वी त्यांच्यात वाद झाल्यामुळे संबंधित युवतीने लकीशी संपर्क तोडला. त्यानंतर ती अमनच्या संपर्कात असल्याने लकीच्या मनात संशय निर्माण झाला की अमनमुळेच त्याचे प्रेमसंबंध बिघडले आहेत.
या संशयातूनच लकीने अमनचा काटा काढण्याचा कट आखला. त्याने अभिषेक, सुलभ व एका अल्पवयीन मित्राच्या मदतीने अमनला गोरेवाडा टेकडी परिसरात नेले आणि तिथे त्याच्यावर धारदार शस्त्राने वार करत खून केला.
पोलीस तपास-
घटनेनंतर मानकापूर पोलिस ठाण्याचे ठाणेदार हरीश काळसेकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तपास सुरू केला. तांत्रिक पुरावे, कॉल डिटेल्स व गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींना अटक करण्यात आली. लकी मेंढेवारसह इतर दोघांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सध्या पोलिसांचा पुढील तपास सुरू असून, खुनामागील इतर कोणतेही धागेदोरे मिळतात का, याकडे लक्ष आहे.











Comments are closed