India Morning News
नागपूर:
शहराच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. नागपूर महानगरपालिकेला ३१५ कोटी रुपयांचा विकास निधी मंजूर करण्यात आला असून, यामुळे शहरातील रस्ते, पाणीपुरवठा, जलनिस्सारण आणि स्वच्छता यांसारख्या मूलभूत सुविधांना नवा वेग मिळणार आहे.
नगरविकास विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयानुसार, हा निधी नागपूरच्या अधिसूचित नागरी सुविधा प्रकल्पांसाठी वापरण्यात येणार आहे. शहराचा जलद विस्तार आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेता, पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी ही निधी तरतूद अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.
या रकमेतून मुख्य व उपरस्त्यांचे कंक्रीटीकरण, पाणीपुरवठा लाइनचे आधुनिकीकरण, नवीन ड्रेनेज पाइपलाइन, उद्याने व बालमैदानांचा विकास अशी विविध कामे हाती घेतली जाणार आहेत. याशिवाय, स्मार्ट लाईटिंग प्रणाली, घनकचरा व्यवस्थापन, स्वच्छता केंद्रे आणि सार्वजनिक शौचालयांचे आधुनिकीकरण यासाठीही निधीचा वापर केला जाईल.
हा निर्णय नागपूरला स्मार्ट सिटीच्या दिशेने नेणारा ठोस टप्पा मानला जात असून, अनेक प्रलंबित नागरी प्रकल्पांना गती मिळेल.
राजस्व व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले. त्यांनी सांगितले की, “या निधीच्या माध्यमातून पुढील काही महिन्यांत नागपूरकरांना रस्ते, पाणीपुरवठा आणि नागरी सुविधांमध्ये लक्षणीय सुधारणा जाणवेल.”







