Shopping cart

  • Home
  • News
  • नागपूरमध्ये पहिल्या पावसातच अडथळे; वादळी वाऱ्यांनी झाडे कोसळली, वाहतूक व्यवस्थेचा खेळखंडोबा

नागपूरमध्ये पहिल्या पावसातच अडथळे; वादळी वाऱ्यांनी झाडे कोसळली, वाहतूक व्यवस्थेचा खेळखंडोबा

June 26, 20251 Mins Read
46

India Morning News

Share News:
Share

नागपूर:- नागपूर शहरात बुधवारी रात्री झालेल्या पहिल्याच जोरदार पावसाने महापालिकेच्या पूर्वतयारीचा फोलपणा उघड केला. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार शहरात ३२.२ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली असून, कमी प्रमाणातील पावसानेही शहराची वाहतूक आणि नागरी सेवा विस्कळीत केली आहे.

संध्याकाळच्या वेळेस अचानकपणे पावसाला सुरुवात झाली आणि नंतर ते मुसळधार स्वरूप धारण करत रात्री उशिरापर्यंत सुरूच राहिला. वाऱ्याचा जोर असल्याने झिंगाबाई टाकळी, वर्धा रोड, नरेंद्र नगर, नंदनवन, मेडिकल, त्रिमूर्ती नगर आणि सदर परिसरात अनेक झाडे रस्त्यांवर कोसळली. घटनास्थळी अग्निशमन विभाग आणि आपत्कालीन यंत्रणा तातडीने दाखल होऊन मार्ग मोकळा करण्याचे प्रयत्न सुरू केले.

महापालिका सज्जतेचा अभाव, नागरिक त्रस्त-
शहरातील काही भागांमध्ये पावसाचे पाणी रस्त्यांवर साचल्याने गाड्या अडकल्या आणि नागरिकांना अपार त्रास सहन करावा लागला. निचऱ्याची योग्य व्यवस्था नसल्याने घरांच्या परिसरात आणि रस्त्यांवर गटारांचे पाणी वाहताना दिसले. अनेक नागरिकांनी महापालिकेवर केवळ कागदोपत्री नालेसफाई झाल्याचा आरोप केला आहे.

आपत्कालीन यंत्रणा एकत्र कामावर-
शहरात निर्माण झालेल्या या परिस्थितीमुळे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाने अग्निशमन, वाहतूक विभाग आणि महावितरण यंत्रणांना समन्वयाने काम करण्याचे आदेश दिले आहेत.

पुढील दोन दिवस सतर्कतेचा इशारा-
हवामान खात्याने विदर्भात पुढील ४८ तासांत जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. बुधवारी पडलेला पाऊस ही केवळ सुरुवात असल्याचे सांगण्यात आले असून, नागपूर व परिसरात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. नागरिकांना घराबाहेर पडताना खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Share News:
Share

Comments are closed

Related Posts

Share