India Morning News
नागपूर गुन्हे शाखेच्या सोशल सिक्युरिटी विंगने देहव्यापारविरोधातील मोहिमेला वेग देत उमरेड रोडवरील एका लॉजवर मध्यरात्री छापा टाकून महत्त्वाची कारवाई केली. या कारवाईत दलदलीत ढकललेल्या एका अल्पवयीन मुलीची सुटका करण्यात आली, तर दलाली करणारी विद्या धनराज फुलझेले (वय ४५, रा. शारदा लेआउट, खरबी) हिला अटक करण्यात आली.
पोलिस आयुक्त डॉ. रविंद्रकुमार सिंगल यांच्या निर्देशांनुसार १३ नोव्हेंबरच्या रात्रीपासून संशयित ठिकाणी नाकेबंदी आणि शोधमोहीम सुरू होती. गोपनीय माहितीच्या आधारे हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या परिसरातील हॉटेल यशराज इन येथे छापा घालण्यात आला.
छाप्यात मुलीची सुटका करताना ₹२,५०० रोकड, मोबाईल, DVR यासह एकूण ₹२०,७३० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. हुडकेश्वर पोलिसांनी या प्रकरणी कलम १४३(४) बीएनएस आणि पीटा कायद्यानुसार गुन्हा नोंदवला आहे.
ही कारवाई अतिरिक्त पोलिस आयुक्त (गुन्हे) वसंत परदेशी, डीसीपी राहुल मकनिकर आणि एसीपी अभिजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पीआय राहुल शिरे, PSI प्रकाश माठणकर आणि त्यांच्या पथकाने केली.









