India Morning News
नागपूर — गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने “ऑपरेशन शक्ती” अंतर्गत अजनी परिसरात धडक कारवाई करून स्पाच्या नावाखाली सुरू असलेला देहव्यापार उघड केला. या छाप्यात दोन महिलांना अटक करण्यात आली असून एका तरुणीची सुटका करण्यात आली. तिन्ही जणींना पुढील कारवाईसाठी अजनी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
कारवाई अजनी रोडवरील मेडिकल कॉलेजसमोर असलेल्या क्लासिक अंबर अपार्टमेंटमधील “एक्सोटिक स्पा अँड सॅलून” येथे करण्यात आली. पोलिसांना येथे बेकायदेशीर व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर बोगस ग्राहक पाठवून सापळा लावण्यात आला. ग्राहकाने 6 हजार रुपयांमध्ये व्यवहार निश्चित करताच पथकाने आत प्रवेश करून संबंधित महिलांना ताब्यात घेतले.
अटक केलेल्या महिलांची नावे प्रतिमा मंगेश बडगे आणि किरण दयालू उके अशी आहेत. तपासात प्रतिमा ही स्पाची मालक, तर किरण रिसेप्शनवर व्यवहार पाहत असल्याचे समोर आले. प्रतिमा यापूर्वीही एका प्रकरणात पीडित म्हणून आढळली होती. ती नंतर रायपूरला गेली आणि तेथे देहव्यापारात सक्रिय झाली. तिथे तिची ओळख एका तरुणीशी झाली असून अधिक पैसे मिळतील या आश्वासनाने तिने तिला नागपूरात आणल्याचे पोलिसांनी सांगितले. सुटलेली तरुणी रायगड जिल्ह्यातील असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले.
छाप्यात दोन मोबाईल, सीसीटीव्ही डीव्हीआर, पेन ड्राईव्ह आणि रोकड असे एकूण 27 हजार रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले. हे स्पा सुमारे पाच महिन्यांपासून कार्यरत असल्याचेही उघड झाले. आरोपींवर अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा नोंदवून अजनी पोलिस पुढील तपास करत आहेत.









