India Morning News
राज्यातील काही भागांत अनधिकृत बालगृहे आणि अनाथाश्रमांमध्ये मुलांवर होत असलेल्या लैंगिक अत्याचारांच्या पार्श्वभूमीवर नागपूर शहर पोलिसांनी जनतेला सतर्कतेचं आवाहन केलं आहे. आळंदी, पुणे आणि ठाणे जिल्ह्यांमध्ये उघडकीस आलेल्या गंभीर प्रकारामुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे.
या प्रकारांमध्ये बालकांना अनधिकृत संस्थांमध्ये बळजबरीने ठेवून त्यांच्यावर शारीरिक, मानसिक आणि लैंगिक शोषण केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. हे प्रकार बाल न्याय अधिनियम २०१५, सुधारित अधिनियम २०२१ आणि महाराष्ट्र राज्य बाल न्याय नियम २०१८ चे स्पष्ट उल्लंघन आहेत.
नागपूर शहराचे पोलीस आयुक्त डॉ. रविंद्रकुमार सिंगल यांच्या मार्गदर्शनाखाली अशा अनधिकृत संस्थांवर कठोर कारवाईसाठी मोहिम हाती घेण्यात आली आहे. नागपूर पोलीस दल अशा संस्थांचा शोध घेण्यासाठी प्रयत्नशील असून दोषींवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
पोलीसांकडून नागपूरकर जनतेस आवाहन करण्यात येत आहे की, जर कोणालाही अशा संस्थांविषयी माहिती असल्यास त्यांनी ती त्वरित पुढील अधिकाऱ्यांना कळवावी –
श्रीमती नयना मुंडे, आयुक्त, महिला व बालविकास, पुणे
चाईल्ड हेल्पलाईन – १०९८
बालकांच्या सुरक्षेसाठी ही माहिती देणे ही आपली जबाबदारी आहे, असे पोलीस दलाने स्पष्ट केले आहे.








Comments are closed