India Morning News
पुणे : नवले पूल परिसरात गुरुवारी संध्याकाळी झालेल्या भीषण अपघाताने संपूर्ण पुणे हादरलं आहे. एका भरधाव कंटेनरनं तब्बल २० हून अधिक वाहनांना धडक देत भीषण साखळी अपघात घडवला. या दुर्घटनेत ८ जणांचा जळून मृत्यू, तर २५ जण जखमी झाले असून, काहींची प्रकृती गंभीर आहे.
प्राथमिक तपासानुसार, साताऱ्याकडून मुंबईकडे जाणारा राजस्थान क्रमांकाचा कंटेनर उतारावरून वेगाने खाली येताना ब्रेक फेल झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या दरम्यान एका सीएनजी कारला जोरदार धडक बसली आणि कार दोन कंटेनरमध्ये अडकली. काही क्षणांतच सीएनजी सिलिंडरचा स्फोट झाला आणि आग वेगाने पसरली. दोन्ही कंटेनर आणि आसपासची वाहने पेटल्याने मोठी जीवितहानी झाली.
अग्निशमन दल, पोलीस आणि बचाव पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अनेक तासांच्या प्रयत्नांनंतर आग नियंत्रित करण्यात आली. आतापर्यंत दोन महिला आणि एका मुलीसह अनेक मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. आणखी काही मृतदेह अडकले असण्याची शक्यता आहे.
जखमींना जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आलं असून, परिस्थितीच्या गंभीरतेमुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
ब्रेक फेल की काहीतरी वेगळं?
डीसीपी संभाजी कदम यांनी सांगितलं की, कंटेनरचा ब्रेक फेल झाल्याची शक्यता नाकारता येत नाही, मात्र घातपाताच्या कोणत्याही शक्यतेला सध्या आधार नाही. प्राथमिकता अडकलेल्या व्यक्तींना सुरक्षित बाहेर काढण्याची आणि वाहतूक सुरळीत करण्याची असल्याचं त्यांनी सांगितलं.
घटनास्थळी क्रेनच्या सहाय्याने दोन मोठी वाहने हटवण्याचं काम सुरू आहे. परिसरात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली असून, पोलिसांनी नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन केलं आहे.
स्थानिक रहिवाशांनी नवले पुलावरील रस्ता, उतार आणि वाहतूक नियोजनाबाबत प्रशासनाने तत्काळ सुधारणा उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.








