India Morning News
नवी मुंबई : नियोजित जलव्यवस्थापन, सांडपाणी पुनर्वापर आणि शाश्वत जलपुरवठा या क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करत नवी मुंबई महानगरपालिकेने राष्ट्रीय पातळीवर मोठा मान पटकावला आहे. ‘सहावा राष्ट्रीय जल पुरस्कार 2024’ मध्ये स्थानिक स्वराज्य संस्था श्रेणीत नवी मुंबईने देशात अव्वल स्थान मिळवले.
नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे झालेल्या सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. कैलाश शिंदे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. देशभरातून आलेल्या ७५१ प्रस्तावांमधून नवी मुंबईची निवड होणे ही शहराच्या उल्लेखनीय कामगिरीची ठळक नोंद ठरली.
केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या या पुरस्कार सोहळ्यात नवी मुंबईच्या “स्वयंपूर्ण जल” मॉडेलला विशेष दाद मिळाली. जलस्रोत नियोजन, पाणीगळती नियंत्रण, सांडपाणी शुद्धीकरण–पुनर्वापर आणि नागरिकांचा सहभाग हे या मॉडेलचे मुख्य आधारस्तंभ ठरले.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर डॉ. शिंदे म्हणाले की, “हा सन्मान नवी मुंबईकरांचा आहे. शाश्वत पाणी व्यवस्थापनासाठी नागरिकांच्या सक्रिय योगदानामुळेच हे यश शक्य झाले.” आगामी काळातही पर्यावरणपूरक आणि शाश्वत जलधोरणांना प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
नवी मुंबईच्या नेतृत्वक्षम जलव्यवस्थापन मॉडेलला मिळालेला हा राष्ट्रीय गौरव शहराच्या सततच्या प्रगतीची महत्त्वपूर्ण नोंद ठरला आहे.








