India Morning News
नागपूर :
महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या दिशेने नागपूर जिल्हा प्रशासनाने ‘नवसखी उद्योगिनी योजना’ची सुरुवात केली आहे. या योजनेअंतर्गत ८० हजार महिलांना स्वावलंबी बनविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, या उपक्रमाचा शुभारंभ महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते झाला.
कार्यक्रमाच्या पहिल्या टप्प्यात १,६०० महिला बचत गटांना प्रत्येकी १ लाख रुपयांचे बीजभांडवल देण्यात आले. या योजनेद्वारे शहरी व ग्रामीण भागातील महिलांना ‘उमेद’ संस्थेच्या माध्यमातून उद्योजकतेकडे नेण्याचा प्रयत्न केला जात आहे.
बावनकुळे म्हणाले, “ही कर्ज योजना नसून महिलांच्या हाताला रोजगार देणारी प्रगती योजना आहे. पूर्वी जिल्हा खनिज फाउंडेशनचा निधी रस्ते, वीज आणि पिण्याच्या पाण्यासाठी वापरला जात होता, परंतु आता त्याच निधीतून महिलांना उद्योगासाठी सहाय्य दिले जात आहे.”
कार्यक्रमाला अर्थराज्यमंत्री आशिष जयस्वाल, खासदार श्यामकुमार बर्वे, आमदार चरणसिंग ठाकूर, आमदार आशिष देशमुख, तसेच जिल्हा परिषदेचे सीईओ विनायक महामुनी आणि माजी आमदार टेकचंद सावरकर उपस्थित होते.
बावनकुळे यांनी सांगितले की, “पुढील पाच वर्षांत टप्प्याटप्प्याने ८० हजार महिलांना आत्मनिर्भर बनविण्याचे उद्दिष्ट आहे. सध्या १,६०० बचत गटांतील १६,००० महिलांना प्रोत्साहन देण्यात आले असून, प्रत्येक गटाला १ लाख रुपयांचे सहाय्य दिले गेले आहे.”
त्यांनी या योजनेला महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक ऐतिहासिक पाऊल ठरवत “ही योजना महिला उद्योजकतेचा नवा आदर्श निर्माण करेल,” असा विश्वास व्यक्त केला.









