India Morning News
नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) यांच्या नागपूर शहरातील कार्यालयात झालेल्या ‘दिवाळी मिलन’ कार्यक्रमातील नृत्यप्रसंगावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. या घटनेनंतर प्रदेश सरचिटणीस आणि आमदार शिवाजीराव गर्जे यांनी शहराध्यक्ष अनिल अहिरकर यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
दरम्यान, एनसीपीच्या महिला पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिलं असून, माध्यमांवर व्हिडिओ चुकीच्या संदर्भात दाखवल्याचा आरोप केला आहे.
महिला पदाधिकाऱ्यांचा दावा — “व्हिडिओ चुकीचा सादर केला”
नागपूर शहर महिला अध्यक्ष सुनिता येरणे म्हणाल्या, “काही विरोधकांनी माध्यमांवर दबाव टाकून ‘एनसीपी कार्यालयात लावणी डान्स, मला जाऊ द्या ना घरी’ अशा शीर्षकांसह व्हिडिओ वारंवार दाखवला.”
त्या म्हणाल्या, “आम्ही एक कुटुंब म्हणून दिवाळी साजरी करत होतो. त्या कार्यक्रमात प्रत्येकाने आपली कला सादर केली. एक महिला पदाधिकारी व्यावसायिक लावणी नर्तिका असून त्यांनी केवळ आपली कला सादर केली, त्यात अशोभनीय काहीच नव्हतं.”
“महिलांचा सन्मान दुखावला” — सुनिता येरणे
येरणे यांनी पुढे सांगितले की, “माध्यमांनी जाणीवपूर्वक एका महिलेला बदनाम केलं. हे केवळ महिलांच्या सन्मानाचा अवमान नाही, तर आगामी निवडणुका लक्षात घेऊन एनसीपीची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न आहे.”
त्यांनी स्पष्ट केलं की, “माध्यमांनी दाखवलेली क्लिप वास्तवाशी विसंगत आणि दिशाभूल करणारी आहे. दिवाळी कार्यक्रमात झालेल्या नृत्याचा चुकीचा अर्थ लावून पक्षाची प्रतिमा खराब केली गेली आहे.”
या प्रकरणामुळे एनसीपीच्या नागपूर युनिटमध्ये अंतर्गत मतभेद उफाळून आले असून, पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून आता या प्रकरणाची चौकशी केली जाणार आहे.






