India Morning News
महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने नगरपरिषद व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रचारबंदीच्या वेळेत मोठा बदल केला आहे. नव्या नियमानुसार, मतदानाच्या आधीच्या दिवशी रात्री १० वाजता सर्व प्रचारकार्य थांबणार आहे. त्यामुळे २ तारखेला मतदान असल्यास १ तारखेला रात्री १० वाजता प्रचार पूर्णपणे बंद मानला जाणार आहे.
आयोगाने ४ नोव्हेंबरच्या एकत्रित आचारसंहिता आदेशातील आधीची तरतूद बदलत हा सुधारित आदेश जारी केला आहे. पूर्वी मतदानाच्या २४ तास आधी मध्यरात्रीपासून प्रचारबंदी लागू होत असे. मात्र कायद्यातील तरतुदींशी सुसंगतता राखण्यासाठी हा बदल करण्यात आला आहे.
प्रचारबंदी लागू झाल्यानंतर सभा, मोर्चे, ध्वनिक्षेपकांचा वापर, तसेच कोणत्याही स्वरूपातील जाहिरात किंवा प्रसारण पूर्णपणे थांबणार आहे. महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायत व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ च्या कलम २३ नुसार मतदानाच्या दिवशी जाहीर सभा घेणे किंवा त्यात सहभागी होणे निषिद्ध आहे. आयोगाने हाच कायदेशीर आधार घेत नवीन आदेशाची अंमलबजावणी केली आहे.
राज्य निवडणूक आयुक्तांच्या निर्देशांनुसार सचिव सुरेश काकाणी यांनी हा सुधारित आदेश प्रसिद्ध केला असून, निवडणूक प्रक्रियेतील स्वच्छता व शिस्त राखण्यास हा बदल महत्त्वाचा असल्याचे सांगण्यात आले आहे.









