India Morning News
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी (१८ जून) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी ३५ मिनिटे दूरध्वनीवर संवाद साधला. या चर्चेदरम्यान पंतप्रधान मोदींनी काश्मीर प्रश्नावर भारताची भूमिका पुन्हा एकदा ठामपणे मांडली. “भारताने ना कधी मध्यस्थी स्वीकारली आहे, ना भविष्यात कधी स्वीकारेल,” असा स्पष्ट संदेश पंतप्रधानांनी ट्रम्प यांना दिला.
मोदी सध्या जी-७ शिखर परिषदेसाठी कॅनडाच्या दौऱ्यावर आहेत. याच दौऱ्यात दोन्ही नेत्यांमध्ये प्रत्यक्ष बैठक होण्याची शक्यता होती. मात्र, डोनाल्ड ट्रम्प दौरा अर्धवट सोडून अमेरिकेत परतल्यामुळे दोघांमध्ये ही चर्चा फोनवरून झाली.
पंतप्रधान मोदी आणि ट्रम्प यांच्यातील संवादाबाबत माहिती देताना परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी सांगितले की, या चर्चेत दहशतवाद, पहलगाम हल्ल्यानंतरचा तणाव आणि भारत-पाकिस्तान संबंधांबाबत व्यापक चर्चा झाली. मोदींनी स्पष्ट केले की, “भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संवाद हा केवळ द्विपक्षीय आहे आणि कुठल्याही तिसऱ्या देशाच्या मध्यस्थीची गरज नाही.”
मोदींनी आणखी एक मुद्दा अधोरेखित केला की, भारत आणि अमेरिकेतील व्यापार करारांचा काश्मीर प्रश्नाशी काहीही संबंध नाही. युद्ध थांबवण्यासाठी कोणताही व्यापार करार झालेला नाही आणि अमेरिकेच्या हस्तक्षेपाबद्दलही कोणतीही चर्चा झाली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दहशतवादाविरोधातील लढ्याला ट्रम्प यांचा पाठिंबा
भारताच्या दहशतवादाविरोधातील लढ्याला ट्रम्प यांनी संपूर्ण पाठिंबा दर्शवला. ऑपरेशन ‘सिंदूर’ अजूनही सुरू असून भारत आपली कारवाई थांबवणार नाही, असे मोदींनी ट्रम्प यांना सांगितले.
अमेरिकेच्या दौऱ्यावर येता येईल का?
चर्चेदरम्यान ट्रम्प यांनी मोदींना अमेरिकेला येण्याचे निमंत्रण दिले. मात्र, पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे मोदींनी तत्काळ दौऱ्यास असमर्थता दर्शवली. तरीही, भविष्यात भेटीचा प्रयत्न करण्याचे आश्वासन दोन्ही नेत्यांनी दिले.







Comments are closed