India Morning News
नागपूर:- दुचाकी वाहनधारकांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारचा दुचाकी वाहनांवर टोल लागू करण्याचा कोणताही विचार नसल्याचे केंद्रीय रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले आहे. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट करून यासंदर्भात स्पष्टीकरण दिले.
गडकरी म्हणाले, काही प्रसारमाध्यमांकडून दुचाकी वाहनांवर टोल लावण्याबाबत चुकीच्या आणि दिशाभूल करणाऱ्या बातम्या प्रसारित केल्या जात आहेत. मात्र, अशा प्रकारचा कोणताही प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन नाही. दुचाकी वाहनांना टोलमुक्ती पूर्वीप्रमाणेच लागू राहील.
गेल्या काही दिवसांत काही माध्यमांनी १५ जुलैपासून दुचाकी वाहनांनाही टोल लावला जाणार असल्याच्या बातम्या दिल्या होत्या. यावर स्पष्टीकरण देताना गडकरींनी अशा वृत्तांचे खंडन केले असून, अशा असत्य माहितीमुळे जनतेत गैरसमज निर्माण होतो, असेही त्यांनी नमूद केले.
सध्याच्या धोरणानुसार, राष्ट्रीय महामार्गांवर दुचाकी वाहनांना टोलपासून सूट आहे. मात्र, प्रवेश-नियंत्रित महामार्ग (Access Controlled Highways) व एक्सप्रेसवेवर दुचाकी वाहनांचा प्रवेश बेकायदेशीर आहे आणि तो नियम यापुढेही कायम राहणार आहे.
दुचाकी वाहनचालकांनी कुठल्याही टोलच्या अफवांवर विश्वास ठेवू नये. केंद्र सरकारने असा कोणताही निर्णय घेतलेला नाही, असे नितीन गडकरी यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.










Comments are closed