India Morning News
मुंबई : राज्यात मराठी सक्तीच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या चर्चेत आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडत, उद्धव ठाकरे यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. “मराठीच्या प्रेमापोटी नव्हे, तर महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा विरोध उभारला जात आहे,” असा आरोप त्यांनी केला.
“मुख्यमंत्री असताना त्रिभाषा धोरण मान्य, आता विरोध का?”
फडणवीस म्हणाले, “उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी माशेलकर समितीचा त्रिभाषा सूत्रावरील अहवाल मान्य केला होता. आता त्याच अहवालावर आक्षेप घेत आहेत, म्हणजे निवडणुकांच्या तोंडावर भूमिका बदलली आहे. हे खरं तर राजकारण आहे, मराठीच्या हितासाठीचा आग्रह नव्हे.”
“हिंदी सक्ती नाही, ती पर्यायी भाषा –
फडणवीस यांनी स्पष्ट केले की हिंदी भाषा कोणावरही लादली जात नाही. “राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार मराठी, इंग्रजी आणि इतर कोणतीही एक भारतीय भाषा अशा तीन भाषा शिकवण्याचं सूत्र आहे. त्यामुळे हिंदी हा एक पर्याय आहे, सक्ती नाही,” असं त्यांनी सांगितलं.
भावनिकतेऐवजी वास्तव स्वीकारा –
“विद्यार्थ्यांच्या क्रेडिट्ससाठी तीन भाषा आवश्यक आहेत. अन्यथा त्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे भावनांपेक्षा वास्तव समजून घेणं गरजेचं आहे,” असा सल्लाही त्यांनी दिला.
“तज्ज्ञांवर विश्वास ठेवायला हवा-
“माशेलकर, मुणगेकर, थोरात यांच्यासारख्या अभ्यासकांनी तयार केलेल्या अहवालावर आता जर आक्षेप घेतले जात असतील, तर ते तज्ज्ञ महाराष्ट्रविरोधी ठरतील का?” असा रोखठोक सवाल फडणवीसांनी उपस्थित केला.
“मराठीला मान, पण हिंदीचा द्वेष का?”
“मराठी आमच्यासाठी सर्वोच्च आहेच. पण इतर भारतीय भाषांचा अभ्यासही विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर ठरतो. मग हिंदीविरोधाचं राजकारण का? इंग्रजीचं स्वागत, पण हिंदीचा द्वेष – हा दुहेरी मापदंड आहे,” असा टोला फडणवीसांनी लगावला.








Comments are closed