India Morning News
बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणात आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येच्या तपासात महत्त्वाचा आरोपी ठरलेल्या अनमोल बिश्नोईला अखेर भारतात आणण्यात आले आहे. अमेरिकेतून हद्दपार केल्यानंतर तो आज दिल्ली विमानतळावर पोहोचताच NIAच्या अधिकाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतले.
लॉरेन्स बिश्नोईचा धाकटा भाऊ असलेला अनमोल 2022 पासून परदेशात पळून होता. या काळात त्याने अमेरिकेत बसून आपल्या टोळीचे संपूर्ण जाळे नियंत्रित केले होते. शूटरना आदेश देणे, पैशांची वसुली करवून घेणे, गुंडांना आश्रय आणि साधनसामग्री पुरवणे अशा सर्व गोष्टींची जबाबदारी तोच सांभाळत होता. NIAच्या तपासात 2020 ते 2023 दरम्यानच्या अनेक गंभीर घटनांमध्ये त्याचा थेट सहभाग असल्याचे समोर आले आहे.
अनमोलविरुद्ध देशभरात अनेक गुन्हे दाखल आहेत. मुंबई पोलिस त्याला सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबार प्रकरणात ताब्यात घेण्यासाठी न्यायालयात अर्ज करणार आहेत. काही दिवसांपूर्वी अमेरिकेत त्याला बनावट रशियन पासपोर्टसह अटक झाली होती. NIAने त्याच्या अटकेसाठी 10 लाखांचे बक्षीस जाहीर केले होते.
पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला यांच्या हत्येच्या कटातही अनमोल बिश्नोईचे नाव समोर आले होते. बाबा सिद्दीकी यांच्या मुलगा झीशान सिद्दीकी यांनी त्याला भारतात आणून कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी केली आहे.
2024 मध्ये वांद्रे येथे झालेल्या बाबा सिद्दीकी यांच्या हत्याप्रकरणात पोलिसांनी आधीच 26 जणांना अटक केली आहे. अनमोल दीर्घकाळ फरार होता. आता तो भारतात परत आल्याने हे तसेच इतर अनेक प्रकरणांचे तपास वेगाने पुढे जाऊ शकतील, अशी शक्यता व्यक्त होत आहे.









