Shopping cart

  • Home
  • News
  • बारामतीत पवार कुटुंबीय एकत्र, पण अजितदादांची ‘माळेगाव’ प्रचारासाठी अनुपस्थिती लक्षवेधी

बारामतीत पवार कुटुंबीय एकत्र, पण अजितदादांची ‘माळेगाव’ प्रचारासाठी अनुपस्थिती लक्षवेधी

June 21, 20251 Mins Read
74

India Morning News

Share News:
Share

बारामती- बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या ‘एआय’ कार्यशाळेच्या निमित्ताने पवार कुटुंबीय पुन्हा एकदा एकाच मंचावर दिसले. ज्येष्ठ नेते व विद्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार आणि युगेंद्र पवार हे सर्वजण या कार्यक्रमात हजर होते. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची अनुपस्थिती सर्वांच्या चर्चेचा विषय ठरली.

कार्यक्रमाच्या निमंत्रणपत्रिकेत अजित पवार यांचे नाव असले तरी, माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त असल्यामुळे त्यांनी हा कार्यक्रम हुकवला. त्यामुळे ‘पवार कुटुंब एकत्र, पण अजितदादा प्रचारात’ असे चित्र पाहायला मिळाले.

कार्यक्रमादरम्यान खासदार सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यात व्यासपीठावर सुसंवादाचे क्षण टिपले गेले. मात्र अजित पवार यांची अनुपस्थिती जाणवलीच.

दरम्यान, माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीत अजित पवार यांनी स्वत: ‘ब’ गटातून उमेदवारी जाहीर केली आहे. इतकेच नव्हे तर, “पुढील पाच वर्षांकरता कारखान्याचे अध्यक्षपद स्वत: सांभाळणार आहे,” अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली आहे. त्यामुळे प्रचारासाठी ते माळेगाव परिसरातच ठाण मांडून कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधत आहेत.

माळेगावच्या निवडणुकीत आता अजित पवार विरुद्ध चंद्रराव तावरे ,रंजन तावरे या ‘गुरू-शिष्य’ जोडगोळीमध्ये आरोप-प्रत्यारोपांचं रण पेटलं आहे. दुसरीकडे शरद पवार गटाच्या २० उमेदवारांनीही निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतल्यामुळे राजकीय रंगत वाढली आहे.

सुप्रिया सुळे आणि युगेंद्र पवार यांनी शरद पवार गटाच्या प्रचाराचे डोहाळे हाती घेतले आहेत. परिणामी, माळेगाव कार्यक्षेत्रातील ३७ गावांमध्ये राजकीय वातावरण तापले असून ही निवडणूक ‘पवार विरुद्ध पवार’ अशी रंगतदार ठरण्याचे संकेत मिळत आहेत.

Share News:
Share

Comments are closed

Related Posts

Share