India Morning News
पुणे:सारथी, बार्टी आणि महाज्योती या संस्थांमार्फत फेलोशिपच्या जाहिराती तातडीने काढाव्यात, वेळेवर फेलोशिप मिळावी यासह इतर मागण्यांसाठी पुण्यात गेल्या आठवड्यापासून पीएच.डी. विद्यार्थी आंदोलन करत आहेत. या विद्यार्थ्यांनी आपल्या मागण्यांसाठी जोरदार आवाज उठवला असून, त्यांनी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा करण्यासाठी आमदार रोहित पवार यांच्या मध्यस्थीने संपर्क साधला. या चर्चेसाठी मंत्र्यांनी वेळ दिल्याबद्दल आभार मानले असले, तरी विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर ठोस तोडगा निघणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आंदोलक विद्यार्थ्यावर दुहेरी संकट
आंदोलनादरम्यान एका विद्यार्थ्याची प्रकृती अचानक खालावल्याने त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. विशेष म्हणजे, याच विद्यार्थ्याच्या शेतातील सोयाबीन पिक अतिवृष्टीमुळे पाण्यात गेले आहे. एकीकडे नैसर्गिक संकट आणि दुसरीकडे शासकीय उदासीनतेच्या कात्रीत हा विद्यार्थी सापडला आहे. “अस्मानी आणि सुलतानी संकटांनी आम्हाला भरडले आहे. आमच्या रास्त मागण्यांकडे सरकार ढुंकूनही पाहत नाही,” अशी खंत आंदोलक विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.

मागण्यांबाबत सविस्तर चर्चेची अपेक्षा
आमदार रोहित पवार यांनी विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी संपर्क साधला असून, त्यांनी सविस्तर चर्चेसाठी वेळ दिली आहे. “उशिरा का होईना, मंत्र्यांनी दखल घेतल्याबद्दल आभार, पण चर्चेतून ठोस मार्ग निघेल, अशी अपेक्षा आहे,” असे पवार यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, “आम्ही सर्वजण या विद्यार्थ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत.”
विद्यार्थ्यांचा निर्धार कायम
फेलोशिपच्या जाहिराती आणि वेळेवर वितरणासह इतर मागण्यांसाठी विद्यार्थ्यांचा लढा सुरूच आहे. सरकारने या मागण्यांकडे तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. आंदोलक विद्यार्थ्यांनी आपला निर्धार कायम ठेवत, जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.








Comments are closed