India Morning News
पितृपक्ष हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र काळ मानला जातो. या दिवसांत पितरांचे स्मरण करून त्यांना तृप्त करण्यासाठी श्राद्ध, पिंडदान आणि तर्पण केलं जातं. शास्त्रात असं म्हटलं आहे की, पितृपक्षात केलेले पिंडदान केवळ पितरांच्या आत्म्याला मोक्ष मिळवून देत नाही, तर घरात सुख-शांती आणि समृद्धी आणतं.
यंदा पितृपक्ष ७ सप्टेंबरपासून सुरू झाला असून २१ सप्टेंबर २०२५ रोजी समाप्त होणार आहे. देशभरात काही प्रसिद्ध धार्मिक स्थळे अशी आहेत जी पितृ कर्मांसाठी विशेष मानली जातात. जाणून घेऊ या अशा ७ प्रमुख तीर्थस्थळांबद्दल—
१) फल्गु नदी, गया (बिहार)
पिंडदानासाठी सर्वात प्रसिद्ध स्थळ म्हणजे गया. येथे केलेले पिंडदान थेट मोक्ष देतं, अशी श्रद्धा आहे. फल्गु नदीच्या तीरावर दरवर्षी हजारो भाविक आपल्या पितरांचं श्राद्ध करतात. स्कंदपुराण आणि विष्णुपुराणातही या स्थळाचं महात्म्य वर्णिलं आहे.
२) ब्रह्मकपाल, बद्रीनाथ (उत्तराखंड)
चार धामांपैकी एक असलेल्या बद्रीनाथ धामाजवळचं ब्रह्मकपाल घाट पितृ तर्पणासाठी खूप महत्त्वाचं मानलं जातं. इथे केलेले पिंडदान चिरस्थायी फलदायी मानले जातात.
३) सिद्धवट, उज्जैन (मध्य प्रदेश)
महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाजवळचं हे तीर्थ पितृकर्मांसाठी प्रसिद्ध आहे. येथील वटवृक्षाखाली पिंडदान केल्यास आत्म्याला तृप्ती मिळते, अशी मान्यता आहे. पितृदोष निवारणासाठी हे ठिकाण शुभ मानलं जातं.
४) त्र्यंबकेश्वर, नाशिक (महाराष्ट्र)
गोदावरी नदीच्या तीरावर वसलेलं त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग पितृ श्राद्धासाठी अत्यंत महत्त्वाचं ठिकाण आहे. येथे विशेषतः त्रिपिंडी श्राद्ध केलं जातं, जे असमाधानी आत्म्यांच्या शांतीसाठी केलं जातं.
५) प्रयागराज (उत्तर प्रदेश)
गंगा, यमुना आणि सरस्वती या त्रिवेणी संगमावर पिंडदान आणि तर्पण करणं पितरांना प्रसन्न करणारे मानलं जातं. येथे श्राद्ध केल्याने कुटुंबातील संकटं दूर होतात, अशी श्रद्धा आहे.
६) रामेश्वरम (तमिळनाडू)
रामेश्वरममधील धनुषकोडी आणि अग्नितीर्थम ही दोन प्रमुख स्थळं पितृकर्मांसाठी प्रसिद्ध आहेत. येथे केलेलं श्राद्ध अनेक पटींनी फलदायी ठरतं. या ठिकाणी पितरांना मोक्ष मिळतो आणि पितृदोषही नाहीसा होतो, असं मानलं जातं.
७) प्रिंसेप घाट आणि हुगली नदीचे घाट (पश्चिम बंगाल)
कोलकात्याजवळील हुगली नदीचे घाट, विशेषतः प्रिंसेप घाट, पितृ तर्पणासाठी प्रसिद्ध आहेत. गंगेसमान्य हुगलीत केलेलं पिंडदान पितरांना शांती देतं. श्राद्धपक्षात येथे मोठ्या संख्येने भाविक पितृकर्म करतात.








Comments are closed