India Morning News
मुंबई : पोलिस स्मृती दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नायगाव येथील पोलिस मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात उपस्थित राहून पोलिस स्मारकाला पुष्पचक्र अर्पण केले. यावेळी देशभरात गेल्या वर्षभरात कर्तव्य बजावताना शहीद झालेल्या पोलिस जवानांना त्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या संदेशात, देशाच्या सुरक्षेसाठी बलिदान देणाऱ्या ३४ पोलिस अधिकारी आणि १५७ पोलिस कर्मचाऱ्यांसह एकूण १९१ वीर शहीदांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. त्यांच्या शौर्य आणि निष्ठेचे स्मरण करत, त्यांनी पोलिस दल देशाच्या सुरक्षेचा भक्कम आधार असल्याचे सांगितले.
कार्यक्रमादरम्यान सर्व शहीद पोलिसांचे नाव वाचून दाखवण्यात आले, त्यानंतर पोलिस बँडच्या सूरांमध्ये सलामी देण्यात आली. वर्दीधारी अधिकारी आणि जवानांनीही ताठ मानेने शहीदांना आदरांजली वाहिली. या प्रसंगी तीन तोफांच्या सलामीने वातावरण दुमदुमून गेले.
मुख्यमंत्र्यांनी कार्यक्रमानंतर शहीद पोलिसांच्या परिजनांशी संवाद साधत त्यांच्या त्यागाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. तसेच देश-विदेशातील मान्यवर अतिथी आणि वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचीही त्यांनी भेट घेतली.










