India Morning News
कर्जत-जामखेड: महिला सक्षमीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी आमदार रोहित पवार यांच्या पुढाकाराने कर्जत तालुक्यातील महिला बचत गटांना सुनंदा पवार यांच्या उपक्रमांतर्गत २ कोटी ५१ लाख रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले. यासह कर्जत आणि जामखेड तालुक्यातील महिला बचत गटांना व्यवसायासाठी आतापर्यंत तब्बल ४९ कोटी रुपयांचे भांडवल पुरवण्यात आले आहे. मतदारसंघात प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात कर्ज वाटप झाले असून, या संधीचा लाभ घेत अनेक महिलांनी आपले व्यवसाय यशस्वीपणे सुरू केले आहेत.
या कर्ज वाटप कार्यक्रमात आमदार रोहित पवार यांनी महिला भगिनींशी संवाद साधला आणि त्यांच्या नव्या उद्यमांना शुभेच्छा दिल्या. यावेळी स्थानिक महिला पदाधिकारी उपस्थित होत्या. या उपक्रमामुळे महिलांना आर्थिक स्वावलंबन मिळाले असून, त्यांच्या उद्योजकतेच्या हिमतीला प्रोत्साहन मिळाले आहे.
कर्जाच्या माध्यमातून बचत गटांनी शेती, कुक्कुटपालन, दुग्धव्यवसाय, हस्तकला आदी क्षेत्रांत व्यवसाय सुरू केले आहेत. हा उपक्रम स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासोबतच ग्रामीण भागातील महिलांच्या आत्मविश्वासाला चालना देणारा ठरला आहे. यापुढेही अशा उपक्रमांना गती देण्याचे आमदार पवार यांनी आश्वासन दिले.










Comments are closed