India Morning News
पुणे : मावळ तालुक्यातील इंद्रायणी नदीवरील कुंडमळा येथील पूल रविवारी (15 जून) दुपारी अचानक कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला असून, 38 जणांना वाचविण्यात यश आले आहे. या ठिकाणी अनेक पर्यटक उपस्थित असताना ही घटना घडली. सध्या एनडीआरएफकडून बचावकार्य सुरू असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दुर्घटनेप्रती शोक व्यक्त करत जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.
उपमुख्यमंत्र्यांचे तातडीचे निर्देश
दुर्घटनेची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री शिंदे यांनी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधला. त्यांनी बचावकार्याला गती देण्यासाठी एनडीआरएफच्या तुकड्या, अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका घटनास्थळी पाठविण्याचे आदेश दिले. तसेच, अशा दुर्घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा करून राज्यातील जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना दिल्या.
पर्यटनस्थळांवर आपातकालीन यंत्रणा तत्पर ठेवण्याचे निर्देश
पर्यटनस्थळांवर, विशेषत: सुटीच्या दिवशी होणारी गर्दी लक्षात घेता, जिल्हा प्रशासनाने आपातकालीन मदतीसाठी यंत्रणा सज्ज ठेवावी, असे निर्देशही शिंदे यांनी दिले. या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांप्रती त्यांनी सहवेदना व्यक्त केली आहे.
बचावकार्य सुरू
एनडीआरएफ आणि स्थानिक प्रशासनाकडून बचावकार्य तातडीने सुरू करण्यात आले असून, वाचलेल्या 38 जणांना तात्काळ वैद्यकीय मदत देण्यात आली आहे. या घटनेची चौकशी सुरू असून, पुल कोसळण्यामागील नेमके कारण शोधले जात आहे.










Comments are closed