India Morning News
पुणे:पुणे महानगर प्रदेशाला जागतिक अर्थव्यवस्थेत महत्त्वाचे स्थान मिळवून देणाऱ्या ‘पुणे ग्रोथ हब’ प्रारूप आर्थिक बृहत् आराखडा लवकरात लवकर तयार करण्यासाठी सर्वेक्षणाला तातडीने सुरुवात करावी, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिले. सर्व संबंधित घटक व नागरिकांकडून माहिती व सूचना गोळा करण्यासाठी सर्वेक्षण नमुना तयार करावा, असेही त्यांनी सांगितले.
विधानभवन येथे झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी पुणे मनपा आयुक्त नवल किशोर राम, पीएमआरडीए आयुक्त डॉ. योगेश म्हसे (दूरदृष्य प्रणालीद्वारे), अतिरिक्त आयुक्त दीपक सिंगला, पीएमपीएमएल अध्यक्ष पंकज देवरे, जिल्हा परिषद सीईओ गजानन पाटील, महामेट्रो संचालक अतुल गाडगीळ, आयएसईजी संचालक शिरीष संखे उपस्थित होते.
डॉ. पुलकुंडवार म्हणाले, ‘‘नीती आयोगाच्या ‘ग्रोथ हब’ उपक्रमात पुण्याचा समावेश झाला आहे. सध्याची आर्थिक क्षमता, सुविधा, बलस्थाने तसेच भविष्यातील आव्हाने व सुधारणा अपेक्षा यांची माहिती गोळा करून सर्वंकष आराखडा तयार करणे गरजेचे आहे. सर्वेक्षणात माहितीची अचूकता व गुणवत्ता यावर भर द्यावा.’’
मनपा आयुक्त राम यांनी पुण्याची आर्थिक वाढ ५-६ टक्क्यांवरून १० टक्क्यांवर नेण्याचे उद्दिष्ट ठेवले. उद्योगांना प्राधान्य देऊन पीएलआयसारख्या योजनांचा विचार करावा, असे मत त्यांनी मांडले. श्री. संखे यांनी सादरीकरणात मुंबई व सुरतमध्ये ‘ग्रोथ हब’ अंमलबजावणी सुरू असल्याचे सांगितले.
बैठकीस मनपा, पिंपरी चिंचवड मनपा, महामेट्रो, एमआयडीसी, एमएसआरडीसी, प्रदूषण नियंत्रण मंडळ, कौशल्य विकास विभाग, पुणे इंटरनॅशनल सेंटर, मॅकेन्झी ॲण्ड कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.










