Shopping cart

  • Home
  • News
  • जलवाहिनीतील अडथळे शोधण्यासाठी ‘पुशकॅम’ आणि ‘रोबोकॅम’ तंत्रज्ञान

जलवाहिनीतील अडथळे शोधण्यासाठी ‘पुशकॅम’ आणि ‘रोबोकॅम’ तंत्रज्ञान

June 9, 20251 Mins Read
34

India Morning News

Share News:
Share

अखंडित पाणीपुरवठ्यासाठी मनपा आणि ओसीडब्ल्यू चे महत्वपूर्ण पाऊल

नागपूर, 9 जून 2025:

विस्तीर्ण पसरलेल्या नागपूर शहरात मोठ्या सदनिकांपासून ते छोट्या वस्त्यांमध्ये नागपूर महानगरपालिका नियमित पाणी पाणीपुरवठा करीत आहे. शहरातील घरोघरी पाणीपुरवठा करण्यासाठी शेकडो किमी ची जलवाहिनी जमिनीखालून टाकण्यात आली आहे. या शेकडो किमी सर्वदूर पसरलेल्या जलवाहिनींमध्ये गळती किंवा अन्य कुठलाही अडथळा उद्भवला तर तो शोधणे हे मोठे आव्हान ठरते. शहरातील नागरिकांना सुरक्षित शुद्ध पाणी उपलब्ध व्हावे यासाठी नागपूर महानगरपालिका आणि ऑरेंज सिटी वॉटर प्रायव्हेट लिमिटेड (ओसीडब्ल्यू) यांनी महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे.

नागपूर शहरात अखंडित पाणी पुरवठा करताना त्यात येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी आता मनपा आणि ओसीडब्ल्यू ने अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला आहे. अद्ययावत तंत्रज्ञानावर आधारित ‘पुशकॅम’ आणि ‘रोबोकॅम’द्वारे शहराच्या गजबजलेल्या रस्त्यांखालून टाकलेल्या जलवाहिनींमधील अडथळे शोधून त्यावर उपाययोजना करण्यात येत आहेत. नागरिकांना दूषित पाण्याचा पुरवठा किंवा कमी दाबाने येणाऱ्या पाण्याची समस्या उद्भवत असल्यास ‘पुशकॅम’ आणि ‘रोबोकॅम’ जलवाहिनींमध्ये संपूर्ण सूक्ष्म तपासणी करतात. एन्डो 90 रोबोकॅम (Endo 90 – Robocam), स्मॉल पुशकॅम (Small Pushcam) आणि बिग पुशकॅम (Big Pushcam) हे 90 मिमी व्यासाच्या चिंचोळ्या पाईप पासून तर 250 मिमी व्यासाच्या मोठ्या पाईपमध्येही आपली करडी नजर फिरवून अडथळे शोधून काढतात. एन्डो 90 – रोबोकॅम, स्मॉल पुशकॅम आणि बिग पुशकॅम यांचे अत्याधुनिक सेन्सर पाईपच्या आतल्या प्रत्येक इंचाची तपासणी करतात, अगदी बारीकसा दोषही ते सहजपणे शोधून काढतात. या उपकरणांमुळे अनेक वर्षांपासून दुर्लक्षित राहिलेल्या समस्या आता समोर येत आहेत व त्यावर उपाययोजना करून दिलासा देखील मिळत आहे.

कित्येकदा पाईपमध्ये कचरा किंवा गाळ साचल्याने पाण्याचा दाब कमी होतो. हे कॅमेरे अडथळे शोधून ते दूर करण्यास मदत करतात, ज्यामुळे घरापर्यंत योग्य दाबाने पाणी पोहोचविणे सोपे होते. पिण्याच्या पाण्यात होणारे दूषितीकरण आरोग्यासाठी धोकादायक आहे. पाईपमधील गळती असो किंवा जुन्या जोडण्या हे कॅमेरे दूषितीकरणाचे मूळ शोधतात त्यामुळे नागरिकांना शुद्ध पाणी मिळते. जलवाहिनीला जोडलेल्या अनधिकृत जोडण्यांचा देखील हे कॅमेरे शोधतात त्यामुळे अनधिकृत जोडण्या हटविण्यात मदत होत आहे. पाईप जुने झाल्यानंतर त्यांच्या आत गंज चढतो, गाळ साचतो किंवा तडे जातात. हे कॅमेरे पाईपच्या आतील स्थितीची पाहणी करतात, ज्यामुळे जलवाहिनी बदलण्याची गरज कधी आहे, हे वेळीच समजते.

नागपूर महानगरपालिका व ओसीडब्ल्यू ने या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जलवाहिनी व्यवस्थापनात महत्वपूर्ण पुढाकार घेतला आहे. पुशकॅम आणि रोबोकॅम या उपकरणांमुळे नागपूरकरांच्या आरोग्याची काळजी घेत पाणीपुरवठा अधिक कार्यक्षम आणि सुरक्षित करण्यात येत आहे.
पाणीपुरवठ्याबाबत अधिक माहितीसाठी, ग्राहक NMC-OCW हेल्पलाइन क्रमांक 1800 266 9899 वर संपर्क साधू शकतात किंवा contact@ocwindia.com वर ईमेल करू शकतात.

Share News:
Share

Comments are closed

Related Posts

Share