Shopping cart

  • Home
  • Politics
  • राज- उद्धव ठाकरे बंधूंच्या भेटींनी राजकारणात पुन्हा खळबळ; महापालिका निवडणुकीपूर्वी युतीचे संकेत?

राज- उद्धव ठाकरे बंधूंच्या भेटींनी राजकारणात पुन्हा खळबळ; महापालिका निवडणुकीपूर्वी युतीचे संकेत?

September 10, 20250 Mins Read
168

India Morning News

Share News:
Share

मुंबई – आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंच्या भेटींना वेग आला आहे. काही दिवसांपूर्वी गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी उद्धव ठाकरे कुटुंबासह शिवतीर्थ येथे दाखल झाले होते. जवळपास अडीच तास झालेल्या या भेटीमुळे युतीच्या चर्चांना उधाण आले होते. त्यानंतर आज पुन्हा उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि अनिल परब यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवतीर्थ निवासस्थानी भेट घेतली. यावेळी मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकरही उपस्थित होते.

हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून उद्धव आणि राज ठाकरे यांची जवळीक वाढली आहे. हिंदी जीआर मागे घेतल्यानंतर झालेल्या ‘मराठी विजयी मेळावा’मध्ये दोन्ही नेते जवळपास दोन दशकांनी एकाच व्यासपीठावर आले होते. त्यावेळी दिसलेली आपुलकी लक्षवेधी ठरली. मात्र नंतर राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना युतीबाबत कोणतेही वक्तव्य न करण्याचे निर्देश दिल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाला राज ठाकरे यांनी मातोश्रीवर अनपेक्षित हजेरी लावून मोठ्या भावाला शुभेच्छा दिल्या. यामुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले. आता सलग दोन भेटींमुळे दोन्ही पक्ष कार्यकर्त्यांमध्ये महापालिका निवडणुकीपूर्वी एकत्र येणार का, असा प्रश्न अधिकच तीव्र झाला आहे.

दसरा मेळाव्यात ठाकरे बंधू एकत्र दिसणार का? या चर्चांनाही जोर आला आहे. उद्धवसेनेचे आमदार सचिन अहिर यांनी यावर्षीचा दसरा मेळावा ‘न भूतो न भविष्यती’ ठरेल, असा संकेत दिला होता. यावर भाष्य करताना खासदार संजय राऊत यांनी, “राज ठाकरे प्रमुख पाहुणे म्हणून येतील का, हे सांगणे माझ्या हातात नाही. तो निर्णय उद्धव ठाकरेच घेतील,” असे स्पष्ट केले.

Share News:
Share

Comments are closed

Related Posts

Share