India Morning News
रामटेक : रामटेक विधानसभा क्षेत्रातील दोन नगरपरिषद आणि दोन नगरपंचायतींच्या निवडणुकांना सोमवारी मतदारांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला. एकूण 67 हजारांपेक्षा जास्त मतदारांपैकी 46 हजारांहून अधिक नागरिकांनी मतदान करून 69.99 टक्क्यांची प्रभावी नोंद केली. दिवसभर मतदानाची प्रक्रिया शांततेत आणि नियोजनबद्ध रितीने पार पडली.
कन्हान नगरपरिषदेत सुरुवातीला मतदानाची गती मंदावलेली दिसली. मात्र दुपारनंतर केंद्रांवर मतदारांची लक्षणीय वाढ झाली. शेवटपर्यंत रांगा कायम राहिल्या आणि येथे 62.37 टक्के मतदान झाले. महिलांची सक्रीय उपस्थिती विशेषत्वाने जाणवली.
दरम्यान, पारशिवनी नगरपंचायतीत सूर्योदयापासूनच मतदारांनी उत्साहाने धाव घेतली. युवक, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने हक्क बजावत 79.49 टक्के मतदानासह विक्रमी सहभाग नोंदवला. संपूर्ण क्षेत्रांमध्ये पारशिवनीचं प्रदर्शन सर्वाधिक ठरलं.
रामटेक नगरपरिषद भागातही सकाळी मतदान केंद्रांवर मोठी गर्दी दिसून आली. रांगा अनेक ठिकाणी दुपारपर्यंत कायम राहिल्या. अखेरीस 13,404 मतदारांनी मतदानाचा हक्क पार पाडला. कांद्री नगरपंचायतीतही प्रक्रिया सुरळीत राहून 6,859 मतदारांनी सहभाग नोंदवला. कोणत्याही प्रकारच्या त्रासदायक घटना अथवा गैरव्यवहाराची नोंद झाली नाही.
चारही भागांत पोलिसांनी तैनात केलेल्या कडक सुरक्षेमुळे मतदानाचा दिवस निर्विघ्न पार पडला. सर्व उमेदवारांचे नशीब आता EVMमध्ये सीलबंद झाले असून निकालाची प्रतीक्षा नागरिकांसह राजकीय पक्षांमध्ये चांगलीच वाढली आहे.




