India Morning News
हुबळी : कर्नाटकातील हुबळीमध्ये ५ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्या आरोपीचा पोलिस एन्काऊंटरमध्ये अंत झाला आहे. पळून जाण्याचा प्रयत्न करत पोलिसांवर हल्ला केल्यानंतर महिला पोलीस उपनिरीक्षक अन्नपूर्णा यांच्या गोळीबारात आरोपीचा जागीच मृत्यू झाला.
हृदयद्रावक घटना, आरोपीची ओळख-
पीडित बालिकेचा मृतदेह एका ओसाड इमारतीत आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. आरोपी रितेश कुमार, वय ३५, हा बिहारमधील पाटणा येथील रहिवासी असून तो सध्या हुबळीमध्ये तात्पुरत्या निवासात राहत होता. त्याच्यावर पोक्सो कायदा आणि खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तो सुमारे दोन-तीन महिन्यांपूर्वी हुबळीत आला होता आणि तारिहाळ अंडरपासजवळ असलेल्या रिकाम्या जागेवर राहत होता. स्थानिक नागरिकांकडून मिळालेली माहिती आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी त्याला अटक केली होती. चौकशीत मात्र त्याने गुन्हा मान्य केला नव्हता.
हल्ला आणि एन्काऊंटरची परिस्थिती-
पोलीस आयुक्त एन. शशीकुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, चौकशीनंतर काही अधिक माहिती मिळवण्यासाठी पोलिसांनी आरोपीला त्याच्या निवासस्थानी घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्याचवेळी आरोपीने अचानक दगडफेक करत पोलिसांवर हल्ला चढवला आणि पळून जाण्याचा प्रयत्न केला.
या प्रसंगी महिला PSI अन्नपूर्णा यांनी पहिल्यांदा हवेत गोळी झाडून त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. पण आरोपीने न थांबता पळ काढल्याने त्यांनी प्रत्यक्ष गोळीबार केला. दोन गोळ्या लागल्याने रितेश कुमारचा जागीच मृत्यू झाला.
पुढील तपास सुरू-
या घटनेनंतर आरोपीविरोधात पोलिसांवर हल्ला आणि खुनाचा प्रयत्न केल्याचे अतिरिक्त गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून पोलिसांनी संबंधित सर्व पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली आहे.






Comments are closed