India Morning News
अमरावती : भाजपा नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा यांच्यानंतर आता त्यांचे पती आणि अमरावतीचे आमदार रवि राणा यांनाही जीव घेण्याची धमकी देण्यात आली आहे. प्रहार संघटनेचा कार्यकर्ता प्रशांत डिक्कर याने सोशल मीडियावरून “हंसियाने तुझं सिर कलम करीन” अशी थेट धमकी दिल्याचा व्हिडिओ समोर आला असून, तो काही क्षणांतच व्हायरल झाला आहे. या प्रकरणामुळे राजकीय वातावरणात चांगलाच तणाव निर्माण झाला आहे.
या धमकीनंतर राणा समर्थकांनी राजापेठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आहे. दरम्यान, या व्हिडिओमुळे शहरात संतापाची लाट उसळली आहे.
रवि राणा आणि प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांच्यातील वैर हे काही नवीन नाही. दोघांमधील संघर्षाला लोकसभा निवडणुकीदरम्यान उधाण आलं होतं. त्या वेळी कडूंनी राणांविरुद्ध उमेदवार उभा केल्याने राणांचा पराभव झाला आणि त्यानंतर दोघांतील वैर आणखी तीव्र झालं.
या पार्श्वभूमीवर प्रशांत डिक्करचा धमकीचा व्हिडिओ समोर आल्याने परिस्थिती अधिक तापली आहे. या घटनेवर स्वाभिमान पक्षाचे प्रवक्ते विनोद गुहे यांनी जोरदार प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “डिक्कर सारखे लोक प्रसिद्धीच्या हव्यासापोटी हिंसाचाराची भाषा बोलतात. ही लोकशाही नव्हे तर अराजकतेची भाषा आहे. अशा व्यक्तींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे.”
गुहे पुढे म्हणाले, “जर डिक्करला खरोखर हिंमत असेल, तर रवि राणांना हात लावून दाखवावा, मग त्याला स्वाभिमानी युवांची ताकद कळेल.”
दरम्यान, पोलिसांनी धमकीच्या व्हिडिओची सत्यता तपासण्यास सुरुवात केली असून, संबंधित व्यक्तीविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असे पोलिस सूत्रांनी सांगितले आहे. या घटनेनंतर अमरावतीतील राजकीय वातावरण अधिकच तापले असून, राणा समर्थकांमध्ये तीव्र रोष पाहायला मिळत आहे.










