India Morning News
-जीएसटी सवलतींनी वाढवला ग्राहकांचा उत्साह
नागपूर : धनत्रयोदशीच्या निमित्ताने नागपूरच्या बाजारपेठा यंदा सोन्याने उजळल्या. सकाळपासूनच शहरातील सर्व प्रमुख बाजार, मॉल्स आणि शोरूममध्ये खरेदीचा उत्साह उसळला होता. सोनं–चांदी, वाहनं, इलेक्ट्रॉनिक्स, वस्त्र, बर्तन, फर्निचर या सर्वच क्षेत्रांमध्ये विक्रीचा नवा उच्चांक नोंदला गेला. शहरात एकूण 1000 कोटी रुपयांहून अधिकचा व्यापार झाल्याची माहिती व्यापारी संघटनांनी दिली.
धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर शहरातील प्रमुख बाजारपेठा — इतवारी, सदर, धरमपेठ, सीताबर्डी, हिंगणा रोड, मानकापूर — या सगळीकडे दिवसभर ग्राहकांची प्रचंड गर्दी होती. अनेक शोरूमसमोर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. कुणी सोने विकत घेत होतं, कुणी दुचाकी, तर कुणी नवीन एलईडी टीव्ही, मोबाईल किंवा रेफ्रिजरेटरची खरेदी करत होतं.
सोने–चांदीच्या दुकानांमध्ये तर दिवाळीचा सोहळाच रंगला होता. उशिरापर्यंत दागिन्यांच्या खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी कायम होती. सराफा बाजारातच सुमारे १५० कोटी रुपयांचा व्यवहार झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. इलेक्ट्रॉनिक्स दुकाने आणि वाहन विक्री केंद्रांवरही विक्रीचा जोर कायम राहिला.
वाहन क्षेत्रात यंदा मागील वर्षांच्या तुलनेत अधिक उलाढाल नोंदवली गेली. सुमारे ६ हजार दुचाकी आणि १२०० हून अधिक चारचाकी वाहनं धनत्रयोदशीच्या दिवशीच विकली गेली. बर्तन बाजार, भेटवस्तू दुकाने आणि वस्त्रदुकानांतही ग्राहकांची झुंबड उडाली.
जीएसटी 2.0 अंतर्गत काही वस्तूंवरील सवलती आणि विविध बँकांच्या फेस्टिव्हल ऑफर्समुळे या वर्षी खरेदीचा उत्साह दुप्पट झाला. व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, नागपूरने यंदा केवळ विक्रीचा नव्हे, तर उत्साहाचा देखील नवा विक्रम केला आहे.
ऑरेंज सिटीमध्ये यंदाची धनत्रयोदशी ‘धनवर्षा’ ठरली, अशी प्रतिक्रिया व्यापारी वर्तुळातून व्यक्त होत आहे.









