India Morning News
जालना: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी सामाजिक माध्यमांवर उपस्थित केलेल्या प्रश्नांना महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. जालना जिल्ह्यातील दंडात्मक कारवाईच्या मुद्द्यावरून पवारांनी सरकारवर टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना बावनकुळे म्हणाले, “रोहित पवारांनी विधिमंडळात संसदीय आयुधांचा वापर करून प्रश्न उपस्थित करायला हवे होते. पण, त्याऐवजी समाजमाध्यमांवरून नथीतून तीर मारण्याचा प्रयत्न ते करत आहेत.”
बावनकुळे यांनी स्पष्ट केले की, जालना जिल्हाधिकारी, तहसीलदार मंठा आणि परतूर यांच्याकडून एकूण ५५ कोटी रुपये दंडात्मक आदेश पारित झाले आहेत. यापैकी १७.२८ कोटींच्या आदेशांना २०२२ मध्ये तत्कालीन महसूलमंत्र्यांकडे अपीलद्वारे आव्हान देण्यात आले होते. या अपिलांवर वसुली प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली आहे. “स्थगिती म्हणजे दंड माफी नव्हे,” असे बावनकुळे यांनी ठणकावून सांगितले. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने यावर अधिक बोलणे टाळत असल्याचेही त्यांनी नमूद केले. “आम्ही कोणतीही मेहरबानी दाखवलेली नाही आणि भविष्यातही दाखवणार नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.

महसूलमंत्र्यांनी जनतेच्या हिताला प्राधान्य असल्याचे सांगितले. “आमचा बाँड महाराष्ट्रातील जनतेशी आहे,” असे म्हणत त्यांनी सरकारची भूमिका मांडली. यासोबतच, त्यांनी सद्यस्थिती दर्शवणारा तक्ता जोडला आहे. रोहित पवार यांनी विधिमंडळात प्रश्न उपस्थित न करता समाजमाध्यमांवरून टीका केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. बावनकुळे यांच्या उत्तराने सरकारची बाजू स्पष्ट झाली आहे.





Comments are closed