India Morning News
पावसाळा अद्याप संपलेला नसल्याने यंदा हिवाळा उशिरा सुरू होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. पण थंडी सुरू झाल्यानंतर शरीरासोबतच हृदयालाही तिचा ताण सहन करावा लागतो, असा इशारा हृदयविकार तज्ज्ञांनी दिला आहे.
थंड हवामानात शरीरातील रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि रक्तदाब वाढतो. त्यामुळे हृदयाला शरीरभर रक्त पंप करण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागते. यामुळे हृदयावर ताण वाढतो आणि हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका निर्माण होतो.
तज्ज्ञांच्या मते, हिवाळ्यात वृद्ध व्यक्ती, हृदयरुग्ण आणि मधुमेहींमध्ये हा धोका विशेषतः जास्त दिसून येतो. रात्री झोपेत शरीरातील रक्तदाब आणि हृदयाची गती कमी झालेली असते. अशा वेळी झोपेतून अचानक उठल्यास काही सेकंदांसाठी मेंदू आणि हृदयापर्यंत रक्तपुरवठा थांबू शकतो. परिणामी चक्कर येणे, अंधारी दिसणे किंवा बेशुद्ध पडणे अशी लक्षणे दिसू शकतात.
झोपेतून उठताना घाई नको, पाळा हे नियम-
- झोपेतून उठताना आधी बाजूला वळून काही सेकंद शांत राहा.
- हातपाय हलवून हळूहळू बसा आणि मगच उभे राहा.
- यामुळे रक्ताभिसरण सुरळीत होते आणि मेंदू-हृदयाला आवश्यक रक्तपुरवठा कायम राहतो.
- झोपेतून ताडकन उठल्यास काही क्षणांसाठी मेंदूला ऑक्सिजनयुक्त रक्ताचा पुरवठा थांबतो, ज्यामुळे धोका वाढतो.
- हिवाळ्यातील काळजी – हृदयासाठी संरक्षण कवच-
- सकाळी अचानक थंडीत बाहेर पडणे टाळा.
- गरम कपड्यांचा वापर करा आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार जीवनशैली ठेवा.
- शक्यतो सूर्यप्रकाश असताना चालणे अधिक फायदेशीर.
- मॉर्निंग वॉक रिकाम्या पोटीच करा.
- आहारात सलॅड आणि हलका, पौष्टिक आहार ठेवा.
- बाहेर जाणे शक्य नसेल, तर घरात योग आणि हलका व्यायाम करा.
थंड हवामानात रक्त घट्ट होणे, रक्तवाहिन्या आकुंचन पावणे आणि रक्तदाब वाढणे.या तिन्ही गोष्टींमुळे हृदयावर अधिक ताण येतो. त्यामुळे या काळात योग्य काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. हिवाळा आनंदाचा असला तरी आरोग्याच्या दृष्टीने सावध राहणे हेच खरे ‘हार्ट केअर’.









