India Morning News
मुंबई : मुंबईत काल भाजपच्या नवीन कार्यालयासाठी झालेल्या भूमीपूजनप्रसंगी भूखंड हस्तांतरणापासून अनेक अटींचा भंग झाल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार गट) आमदार रोहित पवार यांनी मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. या भूखंडाच्या व्यवहारातील त्रुटी आणि नियमभंगाकडे दुर्लक्ष का केले जात आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

रोहित पवार यांनी आयुक्तांना लेखी निवेदन सादर करून भूखंड हस्तांतरण, अटी-शर्तींचे पालन, परवानग्या आणि इतर बाबींवर स्पष्टता मागितली. “केवळ भाजपचे कार्यालय असल्याने या सर्व बाबींकडे दुर्लक्ष केले जात आहे का?” असा थेट सवाल त्यांनी केला. आयुक्त गगराणी यांनी याबाबत लवकरच लेखी स्पष्टीकरण देण्याचे आश्वासन दिले असून, आम्ही त्याची वाट पाहत आहोत, असे पवार यांनी नमूद केले.
या भूखंड प्रकरणात पारदर्शकता आणि कायद्याचे पालन होणे आवश्यक असल्याचे मत पवार यांनी व्यक्त केले. पालिकेच्या या स्पष्टीकरणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



