India Morning News
“शेतकरी उघड्यावर, सरकार मात्र राजकीय गोट्या खेळतंय!”
पुणे/मुंबई : राज्यातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची शेती, घरदार पूर्णपणे उध्वस्त झाले असताना महायुती सरकार मात्र नुकसानभरपाईसाठी केंद्राकडे मदतीचा प्रस्ताव पाठवण्याऐवजी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपलं राजकीय घर मजबूत करण्यात गुंतलं आहे, असा घणाघाती आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला.
“७ ऑक्टोबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत ‘केंद्राकडे प्रस्ताव तयार करत आहोत’ असं सांगितलं होतं. आज त्याला दोन महिने उलटले तरी प्रस्ताव पाठवला गेला नाही. मग हे सरकार गेल्या दोन महिन्यात नेमकं काय करत होतं? गोट्या खेळत होतं का?” असा संतप्त सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला.
![]()
ते पुढे म्हणाले, “फडणवीस साहेबांना प्रचाराला, सभांना भरपूर वेळ आहे, पण शेतकऱ्यांसाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठवायला वेळ नाही. आधी ‘पॅकेज’च्या नावाखाली शेतकऱ्यांना टोपी घातली आणि आता तर प्रस्ताव पाठवण्याइतकं साधं कामही करू शकत नाहीत. जनतेची कामं सोडून तिन्ही पक्ष फक्त राजकीय कुरघोडीतच मश्गूल आहेत. इतकं निष्क्रिय सरकार महाराष्ट्राने यापूर्वी कधीच पाहिलं नव्हतं.”
“जर या सरकारला थोडीही जनाची किंवा मनाची लाज असेल तर त्वरित केंद्राकडे प्रस्ताव पाठवावा. विरोधी पक्ष म्हणून आमचं या विषयावर बारकाईने लक्ष आहे,” असा इशारा रोहित पवार यांनी दिला.






