India Morning News
पुणे:अभिनेत्री संस्कृती बालगुडेचा भाऊ समर्थ बालगुडे याने २०२४ च्या महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) परीक्षेत ४२ व्या क्रमांकाने यश संपादन केले आहे. पेशाने वकील असलेल्या समर्थने गेल्या अनेक वर्षांपासून स्पर्धा परीक्षेची जिद्दीने तयारी करून हे यश मिळवले. या यशामुळे बालगुडे कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे.
समर्थचे वडील संजय बालगुडे हे पुण्यातील सक्रिय राजकारणी आहेत. काँग्रेस पक्षाने त्यांची प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती केली आहे. संजय बालगुडे यांनी मुलाच्या यशाबद्दल समाधान व्यक्त करताना सांगितले, ‘‘समर्थने अथक मेहनत केली. त्याच्या यशाने आम्हाला अभिमान वाटतो.’’
दुसरीकडे, संस्कृती बालगुडे हिने अभिनय क्षेत्रात आपली छाप पाडली आहे. तिला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. त्यामुळे तिने चित्रपट-सिरीयलच्या माध्यमातून आपले करिअर घडवले. आता तिचा भाऊ शासकीय सेवेत दाखल होणार असल्याने कुटुंबाला दुहेरी आनंद मिळाला आहे.
समर्थच्या यशानंतर पुण्यातील राजकीय व सामाजिक क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. काँग्रेस नेते, मित्रपरिवार आणि नातेवाईकांनी बालगुडे निवासस्थानी भेटी देऊन शुभेच्छा दिल्या. समर्थने आपल्या यशाचे श्रेय कुटुंबीय आणि मार्गदर्शकांना दिले.
बालगुडे कुटुंबाच्या या यशोगाथेने पुन्हा एकदा सिद्ध झाले की, मेहनत आणि समर्पणाने कोणतेही शिखर गाठता येते. समर्थच्या पुढील वाटचालीसाठी ‘इंडिया मॉर्निंग’कडून हार्दिक शुभेच्छा!





