India Morning News
पुणे: मराठा, कुणबी, मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा या समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था, अर्थात ‘सारथी’ ही संस्था 2018 मध्ये स्थापन झाली. पुण्यात मुख्यालय असलेली ही संस्था शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक प्रगतीसाठी मराठा समाजाला सक्षम बनवण्याचे कार्य करत आहे. ‘सारथी’ च्या विविध शैक्षणिक संधी आणि शिष्यवृत्ती योजनांमुळे अनेक विद्यार्थ्यांनी केंद्रीय आणि राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमध्ये यश मिळवले आहे.
‘सारथी’ मार्फत विद्यार्थ्यांना केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) यांच्या परीक्षांसाठी पूर्व प्रशिक्षण, मुलाखतीचे मार्गदर्शन आणि आर्थिक साहाय्य प्रदान केले जाते. 2020 ते 2024 या कालावधीत UPSC च्या विविध परीक्षांमध्ये 112 विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. तर MPSC मध्ये 2020 ते 2023 या कालावधीत 1048 विद्यार्थी यशस्वी ठरले, यापैकी 229 विद्यार्थी वर्ग एक, तर 819 विद्यार्थी वर्ग दोन मध्ये निवडले गेले. ही आकडेवारी ‘सारथी’ च्या कार्याची साक्ष देते.
याशिवाय, ‘सारथी’ विविध शिष्यवृत्ती योजना, कौशल्य विकास कार्यक्रम आणि संशोधनाला प्रोत्साहन देते. स्पर्धा परीक्षांबरोबरच व्यावसायिक शिक्षण आणि उद्योजकतेसाठीही मार्गदर्शन उपलब्ध आहे. मराठा समाजातील तरुणांना स्वावलंबी बनवण्यासाठी ‘सारथी’ ने अनेक उपक्रम हाती घेतले आहेत, जसे की तज्ज्ञांचे मार्गदर्शन, ऑनलाइन प्रशिक्षण आणि शैक्षणिक साहित्याचा पुरवठा.
‘सारथी’ च्या या योजनांमुळे अनेक तरुणांनी प्रशासकीय सेवांमध्ये स्थान मिळवले आहे. संस्थेच्या उपक्रमांबाबत अधिक माहितीसाठी
https: www.sarthi-maharashtragov.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावी. ‘सारथी’ च्या या प्रयत्नांमुळे मराठा समाजातील तरुणांचे स्वप्न साकार होत असून, समाजाच्या प्रगतीचा पाया भक्कम होत आहे.










Comments are closed