Shopping cart

  • Home
  • Pune
  • ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन

ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन

September 18, 20251 Mins Read
183

India Morning News

Share News:
Share

पुणे: ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि शिवचरित्रकार गजानन भास्कर मेहेंदळे (वय ७८) यांचे आज सायंकाळी पुण्यात हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. मेहेंदळे यांचे पार्थिव उद्या, गुरुवारी सकाळी ११ वाजता भारत इतिहास संशोधक मंडळात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. दुपारी १२:३० वाजता वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

गेली ५० वर्षे मेहेंदळे यांनी इतिहास संशोधनाला वाहून घेतले होते. शिवचरित्र आणि युद्ध इतिहासाचे गाढे अभ्यासक असलेल्या मेहेंदळे यांनी मराठी आणि इंग्रजीत अनेक ग्रंथ लिहिले, जे जागतिक स्तरावर प्रसिद्ध आहेत. फारसी, मोडी, इंग्रजी, फ्रेंच, जर्मन भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. “इतिहास म्हणजे संदर्भ, आणि संदर्भ म्हणजेच इतिहास” हा त्यांचा सिद्धांत इतिहास संशोधनाला दिशा देणारा ठरला. सध्या ते इस्लामची ओळख, औरंगजेब आणि दुसऱ्या महायुद्धावरील संशोधन करत होते. त्यांचे दुसऱ्या महायुद्धावरील पुस्तक ५,००० पानांचे असून, प्रकाशनासाठी तयार आहे.

मेहेंदळे यांनी ‘शिवाजी झाला नसता’, ‘टिपू ॲज अ वॉर’, ‘शिवाजी लाईफ अँड टाईम’, ‘शिवचरित्र’, ‘मराठ्यांचे आरमार’ अशी अनेक पुस्तके लिहिली. १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धात ते युद्ध पत्रकार म्हणून बांगलादेश आणि पाकिस्तान सीमेवर उपस्थित होते. मिलिटरी सायन्सचे द्विपदवीधर असलेले मेहेंदळे भांडारकर संस्था आणि भारत इतिहास संशोधक मंडळाशी जोडले गेले होते.

त्यांचे शिष्य लेखक डॉ केदार फाळके म्हणाले, “मेहेंदळे यांनी शिवचरित्र संशोधनाला नवे परिमाण दिले. त्यांच्या निधनाने इतिहास अभ्यासात पोकळी निर्माण झाली आहे, जी कधीच भरून निघणार नाही.” इतिहास संशोधनातील तेजोमय ध्रुवतारा हरपल्याने त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे. त्यांचे कार्य आणि विचार पुढील पिढ्यांना प्रेरणा देत राहतील.

Share News:
Share

Comments are closed

Related Posts

Share