India Morning News
काबूल : पूर्व अफगाणिस्तानमध्ये पाकिस्तानच्या सीमेपासून जवळील परिसरात शनिवारी रात्री उशिरा आलेल्या 6.0 रिश्टर तीव्रतेच्या भूकंपाने मोठी हानी केली आहे. प्राथमिक माहितीनुसार, या आपत्तीत किमान 20 जणांचा मृत्यू झाला असून 115 हून अधिक लोक जखमी झाले आहेत.
या भूकंपाचे केंद्र जलालाबाद शहरापासून सुमारे 27 किलोमीटर अंतरावर नोंदवले गेले. नांगरहार प्रांताची राजधानी असलेल्या जलालाबादपासून जवळ असलेल्या या भागात नुकतेच पूरस्थितीमुळे पाच जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे आपत्तीचे संकट अधिकच गंभीर झाले आहे.
अमेरिकेच्या भूगर्भशास्त्र विभागानुसार, रात्री 11.47 वाजता आलेल्या या भूकंपाचे केंद्र पृथ्वीच्या केवळ 8 किमी खोलीवर होते. मुख्य धक्क्यानंतर 4.5 आणि 5.2 रिश्टर तीव्रतेचे दोन आफ्टरशॉक्सही जाणवले.
स्थानिक प्रशासनाच्या माहितीनुसार, मझार व्हॅलीसह अनेक भागातील घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो, कारण प्रभावित प्रदेश दुर्गम व डोंगराळ असल्याने मदत पोहोचण्यात अडचणी येत आहेत.
तालिबान प्रशासनाने आंतरराष्ट्रीय मदतीचे आवाहन केले आहे. अत्यंत मर्यादित साधनसंपत्तीमुळे मदतकार्य सुरळीत होण्यास अडचणी येत असल्याचे त्यांनी मान्य केले. बचाव आणि मदतीसाठी हेलिकॉप्टरची तातडीने आवश्यकता असल्याचे तालिबानी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.






Comments are closed