India Morning News
मुंबई: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी राजकीय घडामोड घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट — शरद पवार गट आणि अजित पवार गट — अखेर एकत्र लढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
अनेक दिवसांच्या चर्चेनंतर दोन्ही गटांनी मतभेद मिटवून एकत्र येण्याचा निर्णय घेतला असून, याबाबतची अधिकृत घोषणा रविवारी झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत करण्यात आली.
शरद पवार गटाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत, पक्षप्रमुख शरद पवार यांनी ओबीसी आरक्षित जागांवर मूळ ओबीसींनाच प्राधान्य द्यावे असा निर्देश दिला. तसेच, ज्या ठिकाणी योग्य उमेदवार सापडणार नाहीत, तिथे कुणबी प्रमाणपत्रधारकांना उमेदवारी देण्याचे संकेत त्यांनी दिले.
या बैठकीनंतर कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड नगर पंचायतीत दोन्ही गटांनी हातमिळवणी केली. माजी आमदार राजेश पाटील आणि नंदाताई बाभुळकर हे आता संयुक्तपणे निवडणूक लढवणार आहेत. या युतीचा तोडगा मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मध्यस्थीने निघाला.
संयुक्त पत्रकार परिषदेत या निर्णयाची घोषणा करण्यात आली आणि दोन्ही गटांनी एकत्र लढण्याचे संकेत राज्यभर पोहोचवले. या घडामोडीनंतर राज्यातील इतर भागातही दोन्ही गटांमध्ये सामंजस्य होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राजकीय तज्ज्ञांच्या मते, चंदगडमधील ही दिलजमाई महाराष्ट्रातील राजकीय समीकरणात नवे वळण आणणारी ठरू शकते.




