India Morning News
कऱ्हाड – “मुंबईत झाडांची सर्वाधिक कत्तल ही पर्यावरण मंत्री म्हणून आदित्य ठाकरे यांच्या कार्यकाळात झाली,” असा घणाघात भाजप प्रवक्ते आशिष शेलार यांनी केला आहे. त्यांनी ठामपणे सांगितले की, प्रत्येक वर्षी सुमारे ६ ते ७ हजार झाडांची कत्तल झाली, आणि त्यामुळे ठाकरे यांनी विकासकांना थेट लाभ मिळवून दिला, असा आरोप त्यांनी केला. अशा पार्श्वभूमीवर आता ठाकरे यांना पर्यावरणाच्या मुद्द्यावर बोलण्याचा नैतिक अधिकारच नाही, अशी टीकाही शेलारांनी केली.
कराडमध्ये माध्यमांशी बोलताना शेलारांनी ही प्रतिक्रिया दिली. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुल भोसले आणि प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर उपस्थित होते. आदित्य ठाकरे यांच्या एका ट्विटवर प्रश्न विचारण्यात आल्यानंतर शेलार बोलत होते.
‘सबका साथ, सबका विकास’ – भाजपची स्पष्ट दिशा
शेलारांनी सांगितले की, भाजपची घडी अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्न सुरू असून पक्ष विस्ताराचा वेग वाढतो आहे. भाजप बळकट झाला तरच महायुतीची ताकदही वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
उद्धव ठाकरेंवर बेईमानीचा ठपका
महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्या शिंदे गटातील प्रवेशावरून झालेल्या टीकेवर उत्तर देताना शेलार म्हणाले, “संजय राऊत यांना बेईमानीची व्याख्या समजून घ्यावी लागेल. पाटील यांनी स्वतःहून निर्णय घेतला. मात्र उद्धव ठाकरे यांनीच खऱ्या अर्थाने बेईमानी केली – निवडणुकीत आमच्यासोबत राहून नंतर सत्तेसाठी विरोधी बाजूला गेले. त्यामुळे ‘बेईमान ऑफ महाराष्ट्र’ हा किताब त्यांनाच मिळायला हवा.”
अजित पवारांच्या वक्तव्यावर मौन
अजित पवार यांच्या “मी खिशात पैसे घेऊन फिरतो का?” या वक्तव्यावर प्रतिक्रिया विचारल्यावर शेलारांनी थेट उत्तर देण्याचे टाळले. “मी हे विधान ऐकलेलं नाही,” असे सांगत त्यांनी त्या विषयावर बोलणे टाळले.









Comments are closed