India Morning News
“शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे संविधानाच्या बाजूचे नेते” – विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
मुंबई : भारतीय संविधान दिनाच्या पूर्वसंध्येला शिवसेनेच्या मुख्यालय बाळासाहेब भवन येथे संविधानाची प्रस्ताविका व उद्देशिकेचे सामूहिक वाचन करून ‘शाखा तिथे संविधान’ या शिवसेना अभियानाची भव्य सुरुवात शिवसेनेच्या नेत्या तथा विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली.
ही मोहीम शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच युवा खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून राबवली जात आहे. या प्रसंगी शिवसेना सचिव संजय मोरे, शिवसेना प्रवक्ते व मुख्य संयोजक किरण सोनावणे, माजी आमदार राम पंडागळे, शिवसेना मीडिया समन्वयक दिनेश शिंदे, विलास जोशी तसे शिवसेना महिला विभाग प्रमुख इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या,
“भारतीय संविधान हे समानता, स्वातंत्र्य, न्याय आणि संधी यांची हमी देणारे महान दस्तऐवज आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही एकदा स्पष्ट शब्दांत सांगितले होते की न्यायालयात शपथ घ्यायची असेल तर ती संविधानावर हात ठेवूनच घेतली पाहिजे. ‘शाखा तिथे संविधान’ या उपक्रमामुळे शिवसेना संविधाननिष्ठ पक्ष आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित होईल.”
अभियानाचे प्रमुख संयोजक व प्रवक्ते किरण सोनावणे म्हणाले,
“शिवसेनेच्या इतिहासातील हा सुवर्ण क्षण आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक शिवसेना शाखेत संविधानाची प्रस्ताविका व प्रत ठेवून संविधानिक मूल्यांचा व्यापक प्रसार केला जाईल. एक शायर म्हणतो, ‘दोस्त, कभी फुरसत मिले तो मुझे पढ़ना, मुझमें तेरे हर उलझनों का समाधान है… मैं कोई और नहीं, तेरे देश का संविधान हूँ’.”
या अभियानांतर्गत संविधान बाग, संविधान संग्रहालय उभारणे, देशभरातील सर्व रेल्वे स्थानकांवर व विमानतळावर संविधानाची प्रस्ताविका प्रदर्शित करणे, तसेच संविधानासाठी कार्यरत व्यक्ती व संस्थांचा सत्कार आयोजित करणे यासारखे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. लोककलावंतांचाही या अभियानामध्ये सहभाग ठेवण्यात येणार आहे.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन माजी आमदार राम पंडागळे यांनी केले.








