India Morning News
नवी दिल्ली: शिवसेनेच्या नाव आणि पक्षचिन्हावरून सुरू असलेल्या वादाच्या सुनावणीस पुन्हा एकदा विलंब झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने आज (८ ऑक्टोबर) ही सुनावणी पुढे ढकलत १२ नोव्हेंबर ही नवीन तारीख निश्चित केली आहे.
न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी होणार होती. मात्र, सशस्त्र दलासंबंधीच्या महत्त्वाच्या प्रकरणामुळे न्यायालयाकडे वेळेची मर्यादा होती. त्यामुळे आज सुनावणी घेणे शक्य झाले नाही.
या वेळी उद्धव ठाकरे गटाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा हवाला देत लवकर सुनावणीची मागणी केली. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने डिसेंबरमधील तारीख मागितली. अखेरीस न्यायालयाने १२ नोव्हेंबर ही तारीख निश्चित केली.
न्यायालयाने वरिष्ठ वकील कपिल सिब्बल यांना विचारले की अंतिम युक्तिवादासाठी किती वेळ लागेल? त्यावर सिब्बल म्हणाले, “मला फक्त ४५ मिनिटे पुरेशी आहेत.” त्यांनी न्यायालयास सांगितले की, “जानेवारीत स्थानिक निवडणुका होणार असल्याने निर्णय लवकर होणे आवश्यक आहे.”
या प्रकरणाची सुनावणी यापूर्वीही अनेकदा पुढे ढकलली गेली आहे. १९ ऑगस्ट ते १० सप्टेंबरदरम्यान राष्ट्रपती आणि राज्यपाल प्रकरणावर घटनापीठ व्यस्त असल्याने ही सुनावणी थांबली होती.
राज्यात आगामी स्थानिक निवडणुका लक्षात घेता ‘खरी शिवसेना कोणाची?’ या प्रश्नाचे उत्तर सर्वोच्च न्यायालयाकडून येण्याची सर्वत्र उत्सुकता आहे.







Comments are closed