India Morning News
पुणे : शिवाजीनगर-मॉडेल कॉलनी परिसरात भारतीय जनता पक्षाच्या वतीने गेल्या चार महिन्यांपासून राबविण्यात येत असलेल्या पाण्याच्या टाक्या मोफत स्वच्छता मोहिमेला नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. भाजपचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व शहर सरचिटणीस रविंद्र साळेगावकर यांच्या पुढाकाराने ही मोहीम सुरू आहे. आतापर्यंत परिसरातील जवळपास १४० सोसायट्या, अपार्टमेंट व बंगल्यांच्या पाण्याच्या टाक्यांची पूर्णपणे स्वच्छता व निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे.
या मोहिमेअंतर्गत टाक्यांमधील कचरा, पालापाचोळा, दगड, माती, शेवाळ आदी काढून टाकी पूर्ण स्वच्छ केली जाते. त्यानंतर विशेष रसायनांची फवारणी करून टाकीचे निर्जंतुकीकरण केले जाते. ही सेवा पूर्णपणे मोफत असल्याने नागरिकांमध्ये समाधानाची भावना आहे.

राजेश बंगला, नकुल अपार्टमेंट, वीर नेताजी सोसायटी, दख्खन पाटबंधारे गृह रचना सोसायटी, अशोक सोसायटी, चंद्रलोक अपार्टमेंट यांसह अनेक सोसायट्यांनी या मोहिमेचा लाभ घेतला आहे. पीएमसी कॉलनी, पांडवनगर येथील मयूर शेंडगे यांनी सांगितले, “आमच्या दहा इमारतींच्या टाक्या साळेगावकर यांच्या पुढाकाराने स्वच्छ करण्यात आल्या. लोकहिताची कामे त्यांच्याकडून सतत होत असतात.”
मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यातील भूमिपूजन नुकतेच आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या हस्ते पार पडले. ते म्हणाले, “स्वच्छ पाणी व निरोगी आरोग्यासाठी ही मोहीम अत्यंत उपयुक्त व जनकल्याणकारी आहे.” साळेगावकर म्हणाले, “पावसाळ्यात टाक्या अस्वच्छ होतात. नागरिकांना शुद्ध पाणी मिळावे हा या मोहिमेचा उद्देश आहे.”
भूमिपूजन प्रसंगी हेमंत डाबी, किरण ओरसे, सुजीत गोटेकर, रविराज यादव, अपर्णा कुऱ्हाडे, लता धायगुडे, सीमा उत्तेकर, दत्ता घोगल्लू, ईश्वर बनपट्टे आदी पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते.









