Shopping cart

  • Home
  • News
  • सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचा मोठा निर्णय! शेजारील इमारत 100 कोटींना खरेदी

सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचा मोठा निर्णय! शेजारील इमारत 100 कोटींना खरेदी

September 8, 20251 Mins Read
182

India Morning News

Share News:
Share

मुंबई : प्रभादेवीतील सिद्धिविनायक मंदिरात वाढत्या भाविकांच्या गर्दीला सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मंदिर ट्रस्टने मोठा पाऊल उचलले आहे. ट्रस्टने मंदिराशेजारील राम मॅन्शन ही तीन मजली इमारत विकत घेण्याचा निर्णय घेतला असून, तब्बल 100 कोटी रुपयांचा करार अंतिम टप्प्यात आल्याचे कळते.

708 चौरस मीटर जागेवर उभारलेली ही इमारत 20 छोट्या फ्लॅट्सनी सजलेली आहे. बहुतेक घरं भाड्याने दिली असून मालक वरच्या मजल्यावर राहतो. ट्रस्टने या इमारतीबरोबरच सिद्धिविनायक गृहनिर्माण सोसायटीचेही अधिग्रहण करण्यासाठी चर्चा सुरू केली आहे.

शिर्डीच्या धर्तीवर सुविधा
ट्रस्टचे कोषाध्यक्ष आचार्य पवन कुमार त्रिपाठी यांनी सांगितले की, या इमारतीच्या खरेदीनंतर आणि सोसायटीच्या अधिग्रहणानंतर मंदिराचे एकूण क्षेत्रफळ सुमारे 1,800 चौरस मीटरपर्यंत वाढेल. त्यामुळे भाविकांसाठी शिर्डीच्या साईबाबा मंदिराप्रमाणे विशेष दर्शन रांग संकुल उभारले जाईल.

सध्या मंदिराबाहेर रस्त्यावरच लांबच लांब रांगा लागतात. शौचालय, कपडे बदलण्यासाठी खोली किंवा प्रसादगृह यांसारख्या मूलभूत सोयींचा अभाव आहे. नवीन योजनेत हे सर्व सुविधा देण्यात येणार आहेत.

दुप्पट किंमतीत खरेदी
ट्रस्टचे अध्यक्ष सदा सरवणकर यांनी सांगितले की, “राम मॅन्शनसाठी ट्रस्टने 100 कोटी रुपयांचा प्रस्ताव दिला आहे, जो बाजारभावाच्या जवळपास दुप्पट आहे.” इमारतीच्या व्यवस्थापनाने भूखंडावर कोणतेही कायदेशीर वाद नसल्याची हमी दिली आहे.

भव्यतेकडे वाटचाल
सिद्धिविनायक ट्रस्ट राज्याच्या कायदा व न्याय विभागाच्या नियंत्रणाखाली काम करते. विभागानेही या अधिग्रहण योजनेला हिरवा कंदील दिला आहे. मंदिराला दरवर्षी भाविकांकडून मोठ्या प्रमाणावर देणग्या मिळतात. त्यातून केवळ धार्मिक कार्य नव्हे तर वैद्यकीय मदत, शिक्षण आणि इतर सामाजिक उपक्रमांसाठीही मोठी मदत दिली जाते.

या निर्णयामुळे सिद्धिविनायक मंदिर परिसर आणखी भव्य होणार असून, भाविकांच्या सोयीसुविधांचा मोठ्या प्रमाणावर विस्तार होणार आहे.

Share News:
Share

Comments are closed

Related Posts

Share