India Morning News
पुणे: यंदाच्या गणेशोत्सवात विसर्जन मिरवणुकीदरम्यान डीजे आणि डॉल्बीच्या अति तीव्र आवाजाने सामान्य नागरिक त्रस्त झाले. या मिरवणुकीला तब्बल ३० तासांहून अधिक वेळ लागला, ज्यामुळे अनेकांना त्रास सहन करावा लागला. या पार्श्वभूमीवर, कलावंत ढोल ताशा पथक ट्रस्टने डीजे आणि डॉल्बीवर बंदी घालण्याची मागणी लावून धरली आहे. यासाठी रविवारी (दि. १४ सप्टेंबर) बालगंधर्व रंगमंदिराच्या प्रांगणात सकाळी ९ वाजल्यापासून स्वाक्षरी मोहीम आयोजित करण्यात येत आहे. सुजाण नागरिकांनी यात सहभागी होऊन आपला पाठिंबा द्यावा, असे आवाहन ट्रस्टने केले आहे.
सार्वजनिक उत्सवांच्या मिरवणुकीत डीजे आणि डॉल्बीच्या अतिरेकी वापरामुळे सण-उत्सवांचा पारंपरिक आनंद लुप्त होत आहे. सामान्य नागरिकांना याचा त्रास होत असून, आवाजाच्या प्रदूषणामुळे आरोग्यावरही विपरीत परिणाम होत आहेत. याबाबत ट्रस्ट प्रशासनाला निवेदन सादर करणार असून, नागरिकांच्या स्वाक्षऱ्यांसह हे निवेदन राज्याच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवले जाणार आहे. शुक्रवारी (दि. १२ सप्टेंबर) पत्रकार भवनात यासंदर्भात पत्रकार परिषद घेण्यात आली, ज्यात ट्रस्टने आपली भूमिका स्पष्ट केली.
“सज्जन शक्ती समाजात आहे, पण ती संघटित नाही. म्हणूनच नागरिकांनी एकत्र येऊन या समस्येविरोधात आवाज उठवावा,” असे ट्रस्टचे म्हणणे आहे. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी नागरिकांनी रविवारी बालगंधर्व येथे उपस्थित राहून स्वाक्षरी करावी, अशी विनंती ट्रस्टने केली आहे. तसेच, डीजे-डॉल्बीमुळे होणाऱ्या आवाज प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी कायदेशीर नियमावली लागू करण्याची मागणीही जोर धरत आहे. या मोहिमेला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळेल, अशी आशा ट्रस्टला आहे.
संपर्क: कलावंत ढोल ताशा पथक ट्रस्ट
स्थळ: बालगंधर्व रंगमंदिर, पुणे
वेळ: रविवार, १४ सप्टेंबर २०२५, सकाळी ९ वाजल्यापासून











Comments are closed