Shopping cart

  • Home
  • News
  • वाहतूक पोलिसांच्या आरोग्य व सुरक्षेसाठी विशेष उपक्रमाचे आयोजन

वाहतूक पोलिसांच्या आरोग्य व सुरक्षेसाठी विशेष उपक्रमाचे आयोजन

April 29, 20251 Mins Read
48

India Morning News

Share News:
Share

नागपूर शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने आज दिनांक 28 एप्रिल 2025 रोजी, दुपारी 2 ते 3 वाजता स्वागत लॉन येथे वाहतूक विभागातील पोलिस अधिकारी व अंमलदार यांच्या आरोग्य आणि सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण उपक्रम राबवण्यात आला.

या उपक्रमांतर्गत, डॉ. रविंद्र कुमार सिंगल, पोलीस आयुक्त, नागपूर शहर यांच्या हस्ते वाहतूक पोलिसांना उष्माघातापासून संरक्षण मिळावे म्हणून होमिओपॅथीचे ‘सनकेअर’ औषध तसेच रात्रीच्या अंधारात कर्तव्य बजावताना दृश्यता वाढविण्यासाठी ‘शोल्डर रिफ्लेक्टर उपकरणे’ वितरित करण्यात आली.

550 वाहतूक पोलीस कर्मचारी यांना या औषधांचे आणि उपकरणांचे वितरण करण्यात आले. या उपक्रमावर डॉ. रविंद्र कुमार सिंगल, पोलीस आयुक्त, नागपूर शहर यांनी सांगितले, “वाहतूक विभागातील पोलिस अधिकारी आणि अंमलदार हे आपल्या कर्तव्यासाठी अत्यंत महत्त्वाचे कार्य करतात. विशेषत: उन्हाच्या प्रचंड उष्णतेमध्ये आणि रात्रीच्या अंधारात कर्तव्य पार पाडत असताना त्यांची सुरक्षा आणि आरोग्य यांचा विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. आम्ही या उपक्रमाच्या माध्यमातून त्यांच्या कष्टांची कदर करत, त्यांना आवश्यक असलेली शारीरिक आणि मानसिक सुरक्षा प्रदान करीत आहोत.”

ही अभिनव संकल्पना डॉ. अनिल सुदामे यांच्या पुढाकाराने आकाराला आली असून, मैत्री परिवार संस्थेचे सचिव श्री. प्रमोद पेंडके आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला. त्यांच्या सहकार्यामुळे वाहतूक पोलिस बांधवांना उन्हाळ्यातील भीषण उष्णतेपासून संरक्षण मिळवण्यास मदत होणार आहे.

कार्यक्रमाचे आयोजन स्वागत लॉन, नागपूर येथे नागपूर शहराचे सहपोलीस आयुक्त श्री. निसार तांबोळी, अतिरीक्त पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. संजय पाटील, आणि वाहतूक पोलीस उप आयुक्त श्री. अर्चित चांडक यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.
या प्रसंगी वाहतूक पोलीस विभागातील 550 अधिकारी व अंमलदार मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि त्यांनी या उपक्रमाचे मनःपूर्वक स्वागत केले.

उन्हाच्या तीव्रतेमुळे पोलीस अंमलदारांना अनेक आरोग्यविषयक समस्या भेडसावत असतात. त्यामुळे ‘सनकेअर’ औषधाचे वितरण हा एक वेळेवर आणि काळाची गरज ओळखून राबवलेला उपक्रम आहे. तसेच शोल्डर रिफ्लेक्टर उपकरणांमुळे वाहतूक नियमन करताना रात्रीच्या वेळी अंमलदारांची सुरक्षितता वाढणार आहे.

पोलीस उप आयुक्त (वाहतूक) नागपूर शहर, श्री. अर्चित चांडक यांनी सांगितले की, “वाहतूक पोलिस बांधवांच्या आरोग्य व सुरक्षिततेसाठी अशा उपक्रमांची सातत्याने गरज आहे आणि भविष्यातही अधिक अशा उपक्रमांचे आयोजन केले जाईल.”

या उपक्रमामुळे वाहतूक पोलीस दलामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे पोलिसांच्या मनोबलातही लक्षणीय वाढ झाली आहे. नागपूर पोलीस आयुक्तालयाने पोलीस कल्याणासाठी घेतलेले हे पाऊल इतर पोलीस दलांसाठीही प्रेरणादायी ठरणार आहे. भविष्यात अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून पोलिसांचे कार्यसक्षमता व सुरक्षितता अधिक बळकट केली जाणार आहे.

Share News:
Share

Comments are closed

Related Posts

Share