Shopping cart

  • Home
  • News
  • राज्य सरकारचा मुंबई लोकल अपघातानंतर मोठा निर्णय; गर्दी नियंत्रणासाठी वेळापत्रकात बदल

राज्य सरकारचा मुंबई लोकल अपघातानंतर मोठा निर्णय; गर्दी नियंत्रणासाठी वेळापत्रकात बदल

June 10, 20250 Mins Read
68

India Morning News

Share News:
Share

एसी लोकल्सची संख्या वाढवणार

मुंबई : मध्य रेल्वेवरील मुंब्रा स्थानकाजवळ ९ जून रोजी घडलेल्या भीषण अपघातानंतर मुंबईच्या उपनगरी रेल्वे सुरक्षेबाबत गंभीर चिंता व्यक्त होत आहे. धावत्या लोकलमधून प्रवासी खाली पडून चार जणांचा मृत्यू झाल्यानंतर या घटनेची तात्काळ दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय जाहीर केले आहेत.

मुख्यमंत्र्यांनी या घटनेला “अतिशय गंभीर” म्हटले असून, रेल्वेमंत्री आणि राज्य सरकार यांच्यात यावर सखोल चर्चा झाल्याची माहिती त्यांनी दिली. “काल रेल्वेमंत्र्यांसोबत जवळपास पाऊणतास चर्चा झाली. ही घटना अत्यंत गंभीर आहे. केंद्र सरकारने उपनगरी रेल्वे साठी आतापर्यंत सर्वाधिक गुंतवणूक केली आहे,” असे फडणवीस म्हणाले.

प्रवाशांची सुरक्षा महत्त्वाची 
अधिक सुरक्षिततेसाठी लोकल गाड्यांना दरवाजे लावण्याच्या पर्यायावर विचार सुरू असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. काहींनी या बदलामुळे श्वसनाचा त्रास होईल अशी भीती व्यक्त केली आहे. यावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले, “जर दरवाजे लावले, तर योग्य व्हेंटिलेशनसुद्धा असणे आवश्यक आहे, याची सरकारला पूर्ण जाणीव आहे.”

एसी लोकल्सचा विस्तार 
मुंबईत एसी लोकल ट्रेन्सची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. “लोकल ट्रेनमधून प्रवास करणारा प्रवासी दुय्यम नाही. त्यालाही मेट्रोप्रमाणे एसी सुविधा मिळावी, हा आमचा उद्देश आहे,” असे मुख्यमंत्र्यांनी ठामपणे सांगितले. यासाठी भाडेवाढ न करता सुविधा उपलब्ध करण्याचा विचार रेल्वे मंत्रालय करत आहे.

सरकारी कार्यालयांच्या वेळा लवचिक करण्याचा विचार
गर्दी नियंत्रणासाठी शासकीय कार्यालयांच्या वेळेत बदल करण्याचा पर्याय पुन्हा एकदा पुढे आला आहे. “सरकारी कार्यालयांना पूर्वीच फ्लेक्झिबल टायमिंग दिले आहे. आता खासगी कार्यालयांसाठीही काही उपाय करता येतील का, हे पाहिले जात आहे,” असे फडणवीस म्हणाले.

सार्वजनिक वाहतूक सुधारण्यावर भर
दरम्यानच्या काळात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी पावले उचलली जातील. “आपले मेट्रो नेटवर्क पूर्ण न झाल्यामुळेच उपनगरीय रेल्वेवर ताण आहे. त्यामुळे रेल्वे गाड्यांची संख्या वाढवणे, एसी ट्रेन उपलब्ध करून देणे आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणे, या सगळ्या गोष्टी सरकार करत आहे,” असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. मुंबईसारख्या शहरात दररोज लाखो प्रवासी लोकलचा वापर करत असल्याने, गर्दी, वेळेचे नियोजन आणि सुरक्षेचे उपाय ही त्रिसूत्री अधिक प्रभावीपणे राबवण्याचा सरकारचा प्रयत्न असणार आहे.

Share News:
Share

Comments are closed

Related Posts

Share