India Morning News
बारामती – वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामुळे राज्यात संतापाची लाट उसळली आहे. वैष्णवीने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती. या घटनेप्रकरणी पती शशांक हगवणे, सासू लता हगवणे आणि नणंद करिश्मा हगवणे यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, सासरा राजेंद्र हगवणे सध्या फरार असून त्याचा शोध सुरू आहे. विशेष म्हणजे, राजेंद्र हगवणे हे अजित पवार गटाशी संबंधित असल्यामुळे विरोधकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. यावर प्रतिक्रिया देताना अजित पवारांनी स्पष्ट शब्दांत भूमिका मांडली आहे.
गुन्हेगार कोणताही असो, मी सहन करणार नाही
अजित पवार म्हणाले, घटना समजताच मी पिंपरीचे पोलीस आयुक्त यांना थेट फोन केला आणि स्पष्ट आदेश दिले.जो कोणी गुन्ह्यात सामील असेल त्याच्यावर कठोर कारवाई करा. वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिच्या नवऱ्याला, सासू-सासऱ्याला अटक झाली आहे. सासरा मात्र पळून गेला आहे, पण तोही लवकरच पोलिसांच्या ताब्यात येईल. कोणीही कितीही पळून गेला, शेवटी पकडला जाणारच.
गुन्हेगारांना पक्षात जागा नाही
“माझ्या पक्षात अशा नालायक व्यक्तींना थारा नाही. राजेंद्र हगवणे आमचा सदस्य होता, पण जर तो दोषी आढळला तर त्याची तात्काळ पक्षातून हकालपट्टी केली जाईल. आम्ही माणुसकीच्या नात्याने लग्नात जातो, पण कोणाच्या गुन्ह्याची जबाबदारी आमच्यावर थोपवू नका,” असंही अजित पवारांनी ठणकावून सांगितलं.
पोलीस तपास वेगात सुरू
अजित पवारांनी सांगितलं की, या प्रकरणात दोन आरोपी अजून फरार आहेत. त्यांच्या शोधासाठी अधिक पथकं तयार करण्यात आली आहेत. पोलीस काम करत असून कोणालाही सूट मिळणार नाही. आम्ही जबाबदारीनं आणि पारदर्शकतेनं या प्रकरणाकडे पाहत आहोत.
वैष्णवी हगवणे प्रकरणात अजित पवारांनी अत्यंत स्पष्ट भूमिका घेत गुन्हेगारांना संरक्षण न देण्याची भूमिका मांडली आहे. या प्रकरणातील पुढील तपासावर सर्वांचे लक्ष आहे.










Comments are closed